Devendra Fadnavis, Narendra Modi Cabinet : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात जाणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर भाजप नेत्या आणि राज्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे विधान केले. (Devendra Fadnavis latest news)
"देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि प्रभावशाली नेते आहेत. परंतु, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची सर्वात जास्त गरज आहे," असे स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय राजकारणातील संभाव्य प्रवेशाबद्दल मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. राऊतांच्या वक्तव्यनंतर त्यात आणखी भर पडली होती. पण या चर्चेला फडणवीस यांनी खोडून काढत आपण राज्यातच थांबणार असल्याचे सांगितले होते. त्याशिवाय यावर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामील होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे . त्या म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात फडणवीस जिथे आहेत, तिथेच त्यांची गरज आहे.
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आरएसएस किंवा पंतप्रधान मोदी यांच्या मंजुरीशिवाय असा निर्णय घेतला जाऊ शकत नाही.
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
"देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली असल्याशिवाय हे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत, मी त्यांच्यासोबत २५ वर्षे काम केले आहे. आज ते ज्या पदावर आहेत, त्याहून अधिक मोठे व्हावेत अशी प्रार्थना आम्ही नक्कीच करू शकतो. मात्र, सध्या ते जिथे आहेत, तिथे त्यांची महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे," असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्या कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणून 'उपपंतप्रधानपद' करण्याचा प्रयत्नाला आरएसएस पाठिंबा देत असल्याचा दावा राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून दिल्लीबाहेरील एका प्रमुख नेत्याला प्रस्थापित करण्याची तयारी करत आहे. या महत्त्वाच्या पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस सर्वात आघाडीवर आहेत. संघ आणि भाजपमधील प्रमुख व्यक्ती फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात आणून मोठे स्थान देण्याची योजना आखत आहेत, असा दावा राऊतांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.