चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात चौरंगी- पंचरंगी रंजक लढत अपेक्षित आहे. या क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. मुळात महायुती व महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत मानली जात असताना बंडखोरांनी चुरस वाढविली आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
वरोरा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी याच समाजाचे उमेदवार येथे दिले आहेत. काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे आणि भाजपकडून दिवंगत माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना अपेक्षित असताना दोन्हीकडून बंडखोरी झाली आहे. भाजप बंडखोर एहतेशाम अली शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. तर उबाठाचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी बंडखोरी केली. हे दोन्ही उमेदवार आजघडीला आव्हान उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे बहुरंगी लढत इथे अपेक्षित मानली जात आहे.
भाजपने एहतेशाम अली यांच्यावर नुकतीच निष्कासनाची कारवाई केली आहे. अली यांनी चिन्ह मिळाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तर ऊबाठाचे जिवतोडे हेही प्रचारात गती राखून आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी भावाच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. एहतेशाम अली हे वरोरा नगरपरिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेसचे दिवंगत मंत्री संजय देवतळे यांचे ते विश्वासू होते. देवतळे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यावर अली सुद्धा भाजपमध्ये गेले. यावेळी उमेदवारी आपल्याला मिळेल; अशी अपेक्षा असताना संजय देवतळे यांचे पुत्र करण यांना ती मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. तर जिवतोडे यांना उबाठाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात युती आणि आघाडीसोबतच यांचे बंडखोरही मैदानात उतरल्याने इथे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.