

डॉ. माधव सावरगावे
खापरपंजोबांच्या महसुली दप्तरी ‘कुणबी’ अशी स्पष्ट नोंद असतानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये सोनवणे कुटुंबातील दोन व्यक्तींनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलंय. सर्व कायदेशीर कागदपत्रं सादर करून गृहचौकशीही पूर्ण झालेली असताना मागील ८ महिन्यांपासून अर्ज प्रलंबित असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. याप्रकरणी चार वेळा सुनावणी होऊनही निर्णय न झाल्याने इंजिनिअरिंग प्रवेश धोक्यात आलाय. जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
खरज इथल्या शितल योगेश सोनवणे, सृष्टी उदय सोनवणे, खुषी ज्ञानेश्वर सोनवणे आणि सार्थक कल्याण सोनवणे या चार विद्यार्थ्यांनी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे ‘कॅप राउंड’मधून इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलाय. त्यांचे खापरपंजोबा त्रिंबक निवृत्ती सोनवणे यांच्या महसुली नोंदीत स्पष्टपणे ‘कुणबी’ अशी नोंद आहे.
विद्यार्थ्यांनी पंजोबा प्रल्हाद त्रिंबक, आजोबा बाबासाहेब प्रल्हाद, वडील योगेश बाबासाहेब आणि स्वतःचे वंशावळीसह सर्व महसुली आणि शैक्षणिक पुरावे जात पडताळणी समितीकडे दिलेत. तसंच पोलिसांची स्थानिक गृहचौकशीही सकारात्मक झालीये.
मात्र समाज कल्याण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्रिंबक निवृत्ती यांचे वडील निवृत्ती कुशाबा हे ‘मराठा’ असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास कॅप राउंडमधून मिळालेले इंजिनिअरिंगचे प्रवेश रद्द होण्याची भीती असून चारही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
एकीकडे शेतात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाची चिंता, यामुळे सोनवणे कुटुंब अडचणीत आले आहे. ‘सर्व पुरावे दिलेले असताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे,’ असा आरोप करत चारही विद्यार्थ्यांना तात्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं, अन्यथा टाकीवरून खाली उतरणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
घटनास्थळी सरकारी अधिकारी आणि पोलीस दाखल झाले असून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जात पडताळणीबाबत ठोस आश्वासन किंवा निर्णय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर सोनवणे कुटुंब ठाम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.