संजय जाधव, साम टीव्ही
बुलढाणा: जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजूर येथील बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात तपासात हलगर्जीपणा आणि गंभीर चूक करणे पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) यांनी तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या मोठ्या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घाईघाईने तपास करत ही मृत मुलगी शिवानी नावाची असल्याचा निष्कर्ष काढला. इतकेच नव्हे तर, ती जिवंत असतानाही तिला मृत जाहीर करून, तिच्या हत्येच्या आरोपाखाली तिच्या निष्पाप वडील आणि भावाला अटक केली होती.
पोलिसांनी ज्या मुलीला मृत समजून तिच्या कुटुंबीयांना जेलमध्ये पाठवले, ती शिवानी प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले. यामुळे पोलीस प्रशासनाची राज्यभरात मोठी नाचक्की झाली होती. दरम्यान पोलिसांना मिळालेला तो मृतदेह नेमका कोणाचा होता? आणि त्या मृत मुलीची ओळख काय? याचा उलगडा अद्यापही झालेला नाही.
एका जिवंत मुलीला मृत दाखवून निरपराध लोकांना न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबल्याचा ठपका ठेवत अखेर वरिष्ठ पातळीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन एलसीबी पीआय सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.