लोणार–मातळ मार्गावर भीषण अपघात
महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची धडक
एक महिला जागीच ठार, आठ गंभीर जखमी
अपघातानंतर कार चालक फरार
संजय जाधव, बुलढाणा
नवीन वर्षातील दुसऱ्या महिन्याच्या पाहिल्याचं दिवशी बुलढाण्यात भीषण अपघात घडला आहे. लोणार तालुक्यातील लोणार ते मातळ मार्गावर आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास, भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून ८ महिलांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,किनगावजटू येथून मातळकडे नेटसेटच्या कामासाठी महिला मजूर ॲटो (क्रमांक MH-28 R-2211) ने जात होत्या. बाजड यांच्या शेताजवळील वळणावर सरस्वतीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक MH-43 AF-5821) ॲटोला समोरून धडक दिली.
धडकेमुळे ॲटो पलटी झाला आणि त्यातील महिला मजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. या अपघातात जरीनाबी अयुबशहा (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रजना परमेश्वर कास्तोडे (वय ५३), शांताबाई शेवाळे (वय ४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (वय ४०), अलका मधुकर शेवाळे (वय ४०), लक्ष्मण बबन करवते (वय ४५), चंद्रभागा गजानन नागरे (वय ४०), राधा गजानन नागरे तसेच ॲटो चालक आसिफ निंशालशहा (वय ३०) हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सदर वाहन हे हिंवराखंड येथील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिला मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.