रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास
त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात शोककळा पसरली
रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत हे काल संध्याकाळी कोल्हापूरहून रत्नागिरीकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि असंख्य कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
राजेश सावंत यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली होती. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि शांत स्वभावामुळे त्यांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. काही काळापासून ते कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. राजकारणाबरोबरच राजेश सावंत हे उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही ओळखले जात होते. क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग कायम राहिला होता.
त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्याने एक लोकप्रिय, मनमिळावू आणि सर्वपक्षीय मैत्री जपणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.