देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

BJP’s ‘Namo Seva’ Campaign Begins in Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या निमित्ताने ‘सेवा संकल्प अभियानातून महाराष्ट्रात ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ पथनाट्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय.
Namo Seva street play initiative launched in Maharashtra
Namo Seva street play initiative launched in Maharashtrasaam tv
Published On: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचदरम्यान भाजप राज्यासह देशभरात मोदी लाट आणण्यासाठी नवीन रणनीती आखत आहे. त्याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासातील सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाची प्रेरणादायी गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवा नमो सेवा उपक्रम राबवला जाणार आहे.

या अभियानाअंतर्गत ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ या पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रातील शुभारंभ मुंबईतील केसी महाविद्यालय येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोदी ज्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयीन, शालेय जीवनातील घटनांनी अनेकांना प्रभावित केलं होतं. अनेकांना त्यांच्या कामांची भुरळ पडली होती, आता पुन्हा त्याचप्रमाणे भाजपनं रणनीती यातून आखलीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संघर्ष, सेवाभाव, राष्ट्रनिष्ठा आणि जनसेवेचा प्रवास पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडमधील कलाकार पथनाट्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग, तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान १० पथनाट्य प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हे पथनाट्य सादर होणार आहेत. नवोदित कलाकारांना या माध्यमातून जनजागृती आणि सामाजिक संदेश देण्याची संधी मिळणार आहे.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या चरित्रातून आपल्याला सेवाभाव, सुशासन, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळते. त्यांच्या जीवनातील असे प्रेरणादायी क्षण पथनाट्याच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्यासाठी ‘नमो सेवा गाथा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. ‘हनुमान अंश’ या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे रेकॉर्ड निर्माण केले, त्याचप्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ हे पथनाट्य देखील रेकॉर्ड करेल" असा विश्वास यावेळी रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

या शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आमदार अमित गोरखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com