

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच घोले ठाकरे गटाचे शिवबंधन सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Shiv Sena)
घोलेंसोबत यावेळी वडाळा विधानसभेतील ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिंदेंना पाठींबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील अनेक दिवसांपासून अमेय घोले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. घोले हे ठाकरे गटात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. अशात आता आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं पत्रातून स्पष्ट झालं आहे.
काही दिवसांपासून घोलेंनी आपल्या विविध उपक्रमाच्या बॅनरवर पक्षाचे नाव व चिन्ही टाकणं बंद केलं होतं. एकूणच याबाबतची कुणकुण मातोश्रीला लागल्यानंतर वडाळा विधानसभेतील पदाधिकार्यांची आज तातडीत बैठक सेनाभवनात बोलवली आहे.
अमेय घोले यांनी आदित्य ठाकरेंना पत्र लिहित आपला राजीनामा दिला आहे. "मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली.परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक मा.सौ.श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.", असं घोलेंनी पत्रात म्हटलं आहे.
याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंतदुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो, असं लीहीत अमेय घोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.