मातृदिनादिवशी रामटेक-गोंदिया महामार्गावर भीषण अपघात
भरधाव ट्रेलरच्या धडकेत ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
अपघातात मृत तरुणाची आई गंभीर जखमी
संतप्त नागरिकांनी ट्रेलर चालकाला पकडून मारहाण
शुभम देशमुख, भंडारा
देशभरात काल मातृदिन म्हणजेच Mothers Day साजरा करण्यात आला. मात्र या मातृदिनादिवशीच रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका आईने आपल्या डोळ्यांदेखत पोटच्या मुलाला भीषण अपघातात गमावलं. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेलरने रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकांना जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी ट्रेलर चालकाला पकडून बेदम मारहाण केली.बाल्या ओमकार बिरणवारे (वय ३०, रा. देव्हाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाल्या आणि त्याची आई बसमधून उतरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी तिरोडा येथून रामटेकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बाल्या ट्रेलरच्या चाकाखाली अडकला आणि वाहनाने त्याला सुमारे ३० ते ४० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात त्याची आईही गंभीर जखमी झाली असून धडकेमुळे त्या दूर फेकल्या गेल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. ट्रेलर चालकाने मद्यप्राशन केले असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. या भीषण अपघातामुळे रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण आणि चालकाने मद्यप्राशन केले होते का, याचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.