सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी
अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यानं अल्पवयीन मुलीला गरम लोखंडी पक्कडने चटके देऊन अमानुष अत्याचार केला. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी गुंजाळ याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वाईट नजर ठेवत वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नोंदवली आहे. आरोपीने पिडीतेला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती.
श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर आणि पारनेरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने २०२१ पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी भीती तो देत होता. या घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकात्ती लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी यशवंत महाराज थोरात याला ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.