देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत. (Lok Sabha Election 2024)
आपल्या सभेतून ते महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील जंगी सभा घेऊन मोदी-शहांच्या टीकेला उत्तर देत आहेत. दरम्यान, पुढील ३ दिवसांत महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुराळा पाहायला मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी ३ दिवसांत महाराष्ट्रात तब्बल ७ सभा घेणार आहेत. महायुतीने २७, २९ आणि ३० एप्रिल रोजी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा घेण्याचं नियोजन केलं आहे. २७ एप्रिलला मोदी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हापुरात जाहीर सभा घेणार आहेत.
तर २९ एप्रिलला सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात मोदींच्या सभा होणार आहेत. याशिवाय ३० एप्रिल रोजी मोदी सोलापूर, धाराशिव आणि लातूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याची माहिती आहे.
या सभांमध्ये मोदी नेमकं काय बोलणार, मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कोणती गॅरंटी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे मोदींच्या सभांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून देखील सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज सोलापूर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी सभा घेणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे हिंगोली आणि नांदेडमध्ये आज प्रचारसभा घेत आहे. तर पुण्यातही पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर महाविकास आघाडीने सभा घेण्याचं नियोजन केलं आहे. मात्र, त्यांच्या सभेला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.