

पावसाळा सुरू होताच ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसंच इतर संसर्गाचे प्रमाण वाढते. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या, कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी हे संसर्ग अधिक गंभीर ठरू शकतात. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
केमोथेरपीमुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी कमी होऊ शकतात. या पेशी शरीराला संसर्गापासून संरक्षण देतात. त्यामुळे किरकोळ वाटणारा ताप, घसा दुखणं, खोकला, जुलाब किंवा लघवी करताना होणारी जळजळ यांसारखी लक्षणंही गंभीर संसर्गाचे संकेत असू शकतात. अशा वेळी स्वतःच्या औषधं घेण्याऐवजी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी उकळून किंवा शुद्ध केलेलं पाणी पिणं, ताजे आणि स्वच्छ शिजवलेलं अन्न खाणं, रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळणं आणि फळं-भाज्या नीट धुऊन वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वारंवार हात धुणं, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं आणि वैयक्तिक स्वच्छता राखणंही तितकेच महत्त्वाचं आहे.
पावसामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जाणं टाळतात. मात्र केमोथेरपी किंवा फॉलो-अप तपासण्यांमध्ये खंड पडल्यास आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपचार सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. डेंग्यू, मलेरिया किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास कॅन्सर रुग्णांनी विलंब न करता तपासणी करून घ्यावी.
तळेगावमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे डॉ. अभिषेक पुरकायस्थ सांगतात की, कॅन्सर रुग्णांसाठी पावसाळ्यात सर्वात मोठा धोका म्हणजे संसर्ग. १००.४°F (३८°C) किंवा त्यापेक्षा जास्त ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, जुलाब किंवा कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत झालेली असते.
डॉ. अभिषेक पुढे सांगतात की, त्यामुळे पावसाळ्यात होणारा अगदी साधा संसर्गही काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वेळेवर निदान, उपचारांचे नियमित पालन आणि डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार केमोथेरपी किंवा इतर उपचार सुरू ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही कर्करोगावरील उपचार सुरक्षितपणे आणि परिणामकारकपणे सुरू ठेवता येतात.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. संजय नगरकर म्हणाले की, पावसाळ्यात व्हायरल संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसंच दूषित पाणी आणि अन्नातून होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण वाढतं. लहान मुलं, गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे त्यांना ताप, खोकला, जुलाब, उलट्या किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणं दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच गाळुन, उकळून थंड केलेलं पाणी पिणं, ताजं व स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करणं, वारंवार हात धुणं, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणं आणि डासांपासून संरक्षण करणं या साध्या उपायांनी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.