High Blood Pressure: लिंबूपाण्यामुळे खरंच रक्तदाब कमी होतो का? वायरल दाव्यावर डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Lemon Water: लिंबूपाणी पिल्याने उच्च रक्तदाब कमी होतो का? तज्ज्ञांच्या मते, लिंबूपाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं, मात्र ते उच्च रक्तदाबावरील उपचार नाही.
High Blood Pressure
High Blood Pressuresaam tv
Published On

उच्च रक्तदाबाला अनेकदा सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता हळूहळू वाढत राहतो. कालांतराने त्याचा परिणाम हृदय, किडनी आणि रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

अशातच आजकाल सोशल मीडियावर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय व्हायरल होत असतात. त्यामध्ये लिंबूपाणी हा उपायही मोठ्या प्रमाणावर सांगितला जातो. अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जातो की, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे अनेकजण हा उपाय न विचार करता सुरू करतात.

मात्र हा दावा कितपत खरा आहे? केवळ लिंबूपाणी पिऊन रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो का? की हा फक्त एक गैरसमज आहे? याबाबत हिंदुस्तान टाईम्ला परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जन हृदयविकार तज्ज्ञ डॉ. स्वरूप स्वराज पाल यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.

High Blood Pressure
Coronary Artery Disease: हृदयाच्या नसा कमकुवत झाल्यास पायांमध्ये दिसतात ही २ मोठी लक्षणं

रक्तदाब आणि लिंबूपाण्याची चर्चा

डॉ. पाल यांनी सांगितलं की, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सिट्रस फ्लॅव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. विशेषतः रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास त्यांची मदत होऊ शकते. याशिवाय लिंबूपाणी प्यायल्यामुळे शरीराला पुरेसं पाणी मिळते. शरीर हायड्रेट राहिल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे कार्यही सुरळीत राहतं.

मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की, लिंबूपाणी थेट रक्तदाब कमी करतं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी त्याचा रक्तदाबावर होणारा परिणाम अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे लिंबूपाणी हा फक्त चांगल्या जीवनशैलीचा एक भाग असू शकतो, उपचाराचा पर्याय नाही.

लिंबूपाणी खरंच रक्तदाब कमी करतं का?

या प्रश्नावर डॉ. पाल स्पष्ट सांगतात की, सध्या उपलब्ध वैज्ञानिक संशोधनानुसार लिंबूपाणी रक्तदाब कमी करते किंवा उच्च रक्तदाबावर उपचार करते, असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. लिंबूपाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकतं. पण त्याला औषध समजणं ही मोठी चूक ठरेल. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर केवळ लिंबूपाणी पिऊन औषधं बंद करणं किंवा डॉक्टरांचा सल्ला टाळणं धोकादायक ठरू शकतं.

High Blood Pressure
High Blood Pressure: अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास शरीरामध्ये दिसतील ही ६ मोठी लक्षणं

रोज लिंबूपाणी पिणं योग्य आहे का?

लिंबूपाणी आरोग्यासाठी चांगलं असलं तरी त्याचाही अतिरेक टाळायला हवा, असा सल्ला डॉ. पाल देतात.

लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल (ॲसिड) असते. त्यामुळे रोज किंवा खूप जास्त प्रमाणात लिंबूपाणी प्यायल्यास दातांवरील एनॅमल झिजू शकतं. त्याचबरोबर काही लोकांमध्ये ॲसिडिटी, छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स किंवा पोटात अस्वस्थता यांसारख्या समस्या वाढू शकतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करावं?

डॉ. पाल यांच्या मते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी दैनंदिन सवयी आणि योग्य वैद्यकीय उपचार या तिन्ही गोष्टींचा समतोल आवश्यक आहे.

  • आहारात मीठ कमी ठेवा

  • नियमित व्यायाम करा

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा

  • तणावावर नियंत्रण ठेवा

  • डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित घ्या

High Blood Pressure
Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com