Super Obesity: 209 किलो वजन, श्वास घेणंही अवघड; डॉक्टरांनी 32 दिवसांत असा केला चमत्कार, रुग्णाला मिळालं नवं आयुष्य

AIIMS Delhi Bariatric Surgery 209kg Patient: AIIMS दिल्लीतील डॉक्टरांनी 209 किलो वजनाच्या 32 वर्षीय रुग्णावर यशस्वी बॅरिएट्रिक सर्जरी केली. 32 दिवसांच्या तयारीनंतर वजन 172 किलोपर्यंत कमी झाले. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण CPAP शिवाय श्वास घेऊ लागला आणि चालूही लागला.
Super Obesity
Super Obesitysaam tv
Published On

नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) इथल्या डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणावर यशस्वी उपचार करत 209 किलो वजनाच्या 32 वर्षीय रुग्णाला नवं आयुष्य दिलंय. रुग्णाचं वजन आणि शरीराची रचना पाहता त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. त्याला सतत श्वास घेण्यास त्रास होत होता आणि दीर्घकाळापासून CPAP मशीनच्या मदतीने श्वास घ्यावा लागत होता.

डॉक्टरांच्या टीमने जवळपास महिनाभर विशेष तयारी केल्यानंतर रुग्णावर बॅरिएट्रिक सर्जरी केली. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. विशेष म्हणजे, काही दिवसांतच तो CPAP मशीनशिवाय स्वतःहून श्वास घेऊ लागला आणि चालूही लागला.

Super Obesity
High cholesterol: रात्रीचं जेवण बंद केल्याने रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांचं उत्तर ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

वजनामुळे श्वास घेणंही झालं होतं कठीण

एम्सच्या माहितीनुसार, रुग्णाचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तब्बल 74 होता. सामान्य BMIच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. अत्यंत वाढलेल्या वजनामुळे त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याला गंभीर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया म्हणजे झोपताना श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होणं, श्वास घेण्याची अडचण, उच्च रक्तदाब, प्री-डायबेटीस आणि शरीरातील चरबीशी संबंधित डिस्लिपिडिमिया अशा समस्या होत्या.

त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की, श्वसनमार्ग खुला ठेवण्यासाठी त्याच्यावर आपत्कालीन ट्रेकिओस्टॉमी करावी लागली. या प्रक्रियेमध्ये श्वास घेण्यासाठी मानेच्या भागातून श्वसननलिकेपर्यंत एक मार्ग तयार केला जातो. मात्र त्यानंतरही रुग्णाला एका महिन्यापेक्षा जास्त काळ CPAP मशीनच्या मदतीची गरज होती.

वजन २०९ किलो हेच मोठं आव्हान

या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांसमोर केवळ त्याचे 209 किलो वजन हेच आव्हान नव्हतं. त्याच्या पोटाचा आकारही अत्यंत मोठा होता. त्याच्या पोटाचा परिघ सुमारे 198 सेंटीमीटर होता. त्यामुळे त्याला नेहमीच्या ऑपरेशन टेबलवर सुरक्षितपणे झोपवणंही शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत एम्समधील विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन उपचाराची विशेष योजना तयार केली. या टीममध्ये बॅरिएट्रिक सर्जन, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, फिजिशियन, संसर्ग नियंत्रण तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश होता.

32 दिवसांची विशेष तयारी, वजन 209 वरून 172 किलो

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला तब्बल 32 दिवस अतिशय कमी कॅलरी असलेला विशेष आहार देण्यात आला. यासोबत श्वसनाशी संबंधित फिजिओथेरपी, संसर्गापासून बचावासाठी आवश्यक उपाय आणि पोषणविषयक समुपदेशन करण्यात आलं. या विशेष तयारीचा रुग्णाला चांगला फायदा झाला. 32 दिवसांत त्याचे वजन 209 किलोवरून थेट 172 किलोपर्यंत कमी झालं. म्हणजेच त्याचे वजन तब्बल 37 किलोने घटलंय. यासोबतच त्याच्या पोटाचा घेरही सुमारे 20 सेंटीमीटरने कमी झाला.

यामुळे रुग्णाला ऑपरेशनसाठी योग्य स्थितीत आणणं शक्य झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला खास तयार केलेल्या ऑपरेशन टेबलवर झोपवलं. या टेबलमध्ये अतिरिक्त बाजूचे विस्तार देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षितपणे हाताळणं शक्य झालं.

दोन तासांत पूर्ण झाली बॅरिएट्रिक सर्जरी

रुग्णाची प्रकृती शस्त्रक्रियेसाठी योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर लॅप्रोस्कोपिक वन अॅनास्टोमोसिस गॅस्ट्रिक बायपास ही बॅरिएट्रिक सर्जरी केली. ही शस्त्रक्रिया सुमारे दोन तासांत पूर्ण झाली. विशेष म्हणजे, ऑपरेशनदरम्यान कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली नाही.

Super Obesity
Soaked raisins: सकाळी उपाशी पोटी खा रात्रभर भिजवलेले मनुके; मिळतील हे चमत्कारीक फायदे

एम्सच्या सर्जरी विभागातील प्रोफेसर डॉ. मंजूनाथ मारुती पोल यांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या श्वासोच्छवासाची स्थिती स्थिर करणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. ऑपरेशन थिएटरमध्येच रुग्णाच्या बेडवर आपत्कालीन ट्रेकिओस्टॉमी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुरक्षितपणे तयार करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत झपाट्याने सुधारणा

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी त्याला टप्प्याटप्प्याने CPAP मशीनच्या आधारापासून दूर केलं. शस्त्रक्रियेनंतरच्या 13व्या दिवशी रुग्ण कोणत्याही मशीनच्या मदतीशिवाय स्वतःहून श्वास घेऊ लागला. एवढेच नाही तर तो स्वतःच्या पायावर चालू लागला आणि रोजची कामेही स्वतः करू लागला.

रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्याचं वजन आणखी कमी होऊन 160 किलो झालं होतं. त्याच्या पोटाचा घेरही 155 सेंटीमीटरपर्यंत कमी झाला होता. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर लठ्ठपणा असलेल्या म्हणजेच ‘सुपर-सुपर ओबेसिटी’ असलेल्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करणं शक्य असल्याचं दाखवून देतं.

Super Obesity
Healthy Breakfast: आता कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर राहील नियंत्रणात; सकाळच्या नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

या प्रकरणात केवळ रुग्णाचं वजन कमी करणं हा उद्देश नव्हता. त्याच्या पोटाचा आकार कमी करणंही तितकंच महत्त्वाचं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com