

चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. अयोग्य आहारामुळे सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे वाढलेलं वाईट कोलेस्ट्रॉल. ज्यावेळी बॅड (LDL) कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये वाढू लागतं त्यावेळी हृदयाच्या समस्या, हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. काही लोकं वजन कमी होईल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईल या भीतीने रात्रीचं जेवळ टाळतात. मात्र असं केल्याने खरंच फायदा होतो का?
कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी आवश्यक असलेला घटक आहे. मात्र, शरीरातील बॅड (LDL) आणि टोटल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांच्या मते, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण केवळ रात्रीचं जेवण केलं किंवा नाही यावर ठरत नाही.
दिवसभरात तुम्ही काय खाता, किती कॅलरी घेतात, वजन किती आहे आणि शारीरिक हालचाल किती करता, यावर त्याचा अधिक परिणाम होतो. त्यामुळे दिवसभराचा आहार योग्य नसेल, तर फक्त रात्रीचं जेवण टाळून कोलेस्ट्रॉल कमी होईल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरू शकतं.
याबाबत एका वेबसाईटला माहिती देताना मेदांता मेडिसिटी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. तरुण कुमार सांगतात की, काही लोकांमध्ये रात्रीचं जेवण हलकं करणं किंवा काही प्रमाणात कमी करणं फायदेशीर ठरू शकतं.
त्यांच्या मते, जर रात्री कमी खाल्ल्यामुळे दिवसभरातील एकूण कॅलरी कमी होत असतील आणि त्यामुळे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारत असेल तर कालांतराने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, अशा प्रकारचे फायदे प्रत्येकाला होतीलच असं नाही.
डॉ. तरुण यांनी सांगितलं की, अनेकजण स्वतःहून रात्रीचं जेवण बंद करतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला न घेता असा निर्णय घेणं योग्य नाही. कारण रात्री भूक असूनही जेवण टाळल्यास दुसऱ्या दिवशी अनेकजण गरजेपेक्षा जास्त खातात. त्यामुळे वजन वाढण्यासोबतच कोलेस्ट्रॉल वाढण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.
इतकंच नाही तर नियमितपणे रात्रीचं जेवण टाळल्यास शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकांची कमतरताही जाणवू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी विशेष सांगितल्याशिवाय रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करू नये.
डॉ. तरुण कुमार यांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी संपूर्ण दिवसाच्या आहाराकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी भरपूर पदार्थांचा समावेश करा.
जास्त प्रमाणात चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा
तूप, लोणी आणि प्रोसेस्ड फूडचं सेवन शक्य तितकं कमी करा
आठवड्यात किमान पाच दिवस ३० ते ४५ मिनिटं नियमित व्यायाम करा
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.