

टाइप-2 डायबेटीस झाल्यानंतर पुरुष आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. पुरुषांमध्ये डायबेटीसनंतर हार्ट अटॅक आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांचा धोका अधिक दिसून येतो, तर महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असल्याचं एका नव्या अभ्यासातून समोर आलंय आहे.
‘PLOS Medicine’मध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासात ब्रिटनमधील टाइप-2 डायबेटीसचं नुकतंच निदान झालेल्या 28,720 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. 2010 ते 2020 या कालावधीत या रुग्णांच्या प्राथमिक आणि रुग्णालयातील उपचारांच्या आधारे संशोधकांनी माहिती गोळा केली. या रुग्णांची सरासरी 6.8 वर्षे माहिती घेण्यात आली.
संशोधकांनी डायबेटीसनंतर रुग्णांमध्ये कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होतात, त्या कोणत्या क्रमाने आणि किती कालावधीनंतर दिसून येतात, या सर्व अभ्यास केला. यामध्ये उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, किडनी निकामी होण्याची शेवटची अवस्था आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांचा समावेश होता.
अभ्यासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, टाइप-2 डायबेटीस झाल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण अधिक आढळून आलं आहे. महिलांपैकी 8.1 टक्के जणींना डायबेटीसनंतर मानसिक आरोग्याशी संबंधित आजाराचं निदान झालं. यामध्ये चिंता, नैराश्य किंवा शरीराशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 5.3 टक्के होतं.
डायबेटीस असलेल्या महिलांमध्ये स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असू शकतो, असंही अभ्यासातून दिसून आलं.
मात्र, या समस्या केवळ डायबेटीसमुळेच निर्माण होतात, असं ठामपणे म्हणता येणार नाही, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. कारण मानसिक आणि मेंदूशी संबंधित काही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे डायबेटीसवर उपचार करताना डॉक्टरांनी महिलांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचं संशोधकांनी नमूद केलंय.
याशिवाय पुरुषांमध्ये डायबेटीसनंतर हार्ट अटॅक आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांची शक्यता अधिक दिसून आली. अभ्यासात 8.4 टक्के पुरुषांमध्ये हार्ट अटॅक किंवा किडनी निकामी होण्याच्या शेवटच्या अवस्थेकडे जाणारा आजाराचा क्रम दिसून आला. महिलांमध्ये हे प्रमाण 5.3 टक्के होतं. पुरुषांमध्ये डायबेटीस तुलनेने कमी वयात होण्याची शक्यता असतं. यामुळे डायबेटीसशी संबंधित काही गुंतागुंतीच्या समस्या त्यांच्यामध्ये महिलांच्या तुलनेत लवकर दिसू शकतात.
महिलांना मासिक पाळी बंद होण्यापूर्वी म्हणजेच मेनोपॉजपूर्व काळात हृदयाच्या समस्यांपासून काही प्रमाणात नैसर्गिक संरक्षण मिळतं. मात्र डायबेटीस असल्यास हे संरक्षण कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटीस असलेल्या महिलांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
डायबेटीसनंतर उच्च रक्तदाब ही सर्वाधिक आढळणारी आरोग्य समस्या असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. कोणत्याही वयोगटाचा विचार केला तरी आणि पुरुष असो वा महिला, दोन्ही गटांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण सर्वाधिक होतं. डायबेटीस असलेल्या 21.1 टक्के पुरुषांना आणि 20.2 टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागला.
या अभ्यासात डायबेटीस, मानसिक आरोग्य आणि मृत्यूदर यांच्यातील संबंधाचाही अभ्यास करण्यात आला. डायबेटीस झाल्यानंतर ज्या रुग्णांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या, त्यांचा मृत्यू तुलनेने कमी वयात होण्याची शक्यता आढळली.
एकूणच टाइप-2 डायबेटीसचा परिणाम पुरुष आणि महिलांमध्ये सारखा दिसत नाही. पुरुषांमध्ये हृदय आणि किडनीच्या आरोग्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर महिलांमध्ये रक्तदाबासोबतच मानसिक आरोग्य, स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेत होणाऱ्या बदलांकडेही दुर्लक्ष न करण्याची गरज या अभ्यासातून समोर आलं आहे.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.