

जास्वंदाचं फूल दिसायला जितकं सुंदर असतं तितकंच ते आरोग्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. देवी-देवतांच्या पूजेत आवर्जून वापरलं जाणारं जास्वंद औषधी गुणधर्मांसाठीही ओळखलं जातं. जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही जास्वंदाच्या चहाचे काही आरोग्यदायी फायदे नमूद केलेत.
जास्वंदाच्या चहाचं योग्य प्रमाणात नियमित सेवन केल्यास रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. याशिवाय वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्येही ही चहा उपयोगी ठरू शकते.
जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला चहा उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या चहामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब नैसर्गिक पद्धतीने कमी होण्यास हातभार लागू शकतो.
याशिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यासाठीही जास्वंदाची चहा मदत करू शकतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात.
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या आहारात या चहाचा समावेश करावा. हे कमी कॅलरी असलेली पेय असल्यामुळे वजन वाढण्याची भीती राहात नाही. जास्वंदाचा चहा शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचयाची प्रक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. त्याचप्रमाणे शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकण्यासही मदत होते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाण्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
जास्वंदाचा चहा मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठीही उपयोगी ठरू शकतो. यामुळे शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यास मदत होऊ शकते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास हातभार लागू शकतो. त्याचप्रमाणे हा चहा लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानण्यात येतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी सुधारण्यासही त्याची मदत होऊ शकते.
जास्वंदाच्या फुलांपासून चहा तयार करणं अगदी सोपं आहे. घरच्या घरी ही चहा सहज बनवता येते. मात्र नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. दिवसातून साधारण 1 ते 2 कप जास्वंदाची चहा घेणं पुरेसं असल्याचं सांगितलं जातं. त्यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
गर्भवती महिला आणि कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्वंदाची चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. योग्य प्रमाणात सेवन आणि आवश्यक ती काळजी घेतल्यास संभाव्य दुष्परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.