

कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेलं एक प्रकारचा फॅट आहे. मात्र शरीरात त्याचं प्रमाण जास्त झालं तर हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. आजकालची धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही अनेकांसाठी समस्या बनलीये.
अशावेळी आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. लसूण हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. जेवणाची चव वाढवणारी लसूण आरोग्यासाठीही उपयोगी मानला जाते. लसणामध्ये असलेले काही घटक कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे लसूण आहारात कसा समाविष्ट करायचा हे जाणून घेऊया
लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो. लसूण चिरताना किंवा ठेचताना हा घटक तयार होतो. लसणातील काही घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात लसूण आहारात घेणं फायदेशीर ठरू शकतं. लसूण रक्ताभिसरणासाठीही मदत करू शकतो. याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होऊ शकतो.
लसणामध्ये सूज कमी करणारे म्हणजेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आढळतात. शरीरातील अनावश्यक सूज कमी ठेवण्यासाठी हे गुणधर्म मदत करू शकतात. रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही ही बाब महत्त्वाची आहे. कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट करण्यात लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते. लसणातील काही घटक लिव्हरसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून लसणाचा वापर केला जाऊ शकतो.
लसूणाची चटणी बनवण्यासाठी १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड आणि १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेल घ्या.
सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घाला. हे सर्व बारीक वाटून घ्या. चटणी जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालू शकता.
आता या मिश्रणात लिंबाचा रस, जिरेपूड आणि तेल घालून सगळं नीट एकत्र करा. काही मिनिटांत तुमची लसूणाची चटणी तयार होईल. ही चटणी पोळी, पराठा किंवा डाळ-भातासोबत खाता येते.
लसणाची चटणी सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणात थोड्या प्रमाणात घेता येऊ शकते. मात्र लसूण प्रत्येकाला सारखा मानवेलच असं नाही. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास काही लोकांना पोटात जळजळ, अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे चटणी योग्य प्रमाणातच खाणं चांगलं.
लसूण हा आरोग्यदायी आहाराचा एक भाग असू शकतो. मात्र, केवळ लसूणाची चटणी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी होईल असं नाही. वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.