

हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज झाल्यानंतर अनेक रुग्णांना स्टेंट बसवला जातो. स्टेंट बसल्यानंतर आता हृदयाची समस्या कायमची दूर झाली असं अनेकांना वाटतं. मात्र स्टेंट म्हणजे हार्ट अटॅकचे कायमचे उपचार नाहीत. स्टेंटमुळे बंद झालेली रक्तवाहिनी पुन्हा उघडण्यास मदत होते. मात्र ब्लॉकेज होण्यामागची मूळ कारणं शरीरात कायम राहू शकतात. त्यामुळे स्टेंट बसवल्यानंतरही पुन्हा ब्लॉकेज होण्याचा धोका असतो.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीये. त्यांच्या मते स्टेंट हा बंद झालेला मार्ग मोकळा करण्याचं काम करतो. मात्र हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्यामागची कारणं दूर केली नाहीत तर भविष्यात पुन्हा त्रास होऊ शकतो.
स्टेंट बसवलेल्या ठिकाणी पुन्हा रक्तवाहिनी अरुंद होण्याची शक्यता काही रुग्णांमध्ये असते. याला इन-स्टेंट रेस्टेनोसिस असं म्हणतात. शरीरात ब्लॉकेज निर्माण करणारी कारणं कायम राहिल्यास स्टेंटच्या आसपास हळूहळू पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय स्टेंट थ्रोम्बोसिस म्हणजे स्टेंटच्या आत रक्ताची गाठ तयार होण्याचा धोकाही असतो. रक्ताच्या प्रवाहात अडथळा येणं किंवा डॉक्टरांनी सांगितलेली औषधं स्वतःहून बंद करणं यामुळे हा धोका वाढू शकतो.
स्टेंट हा शरीरासाठी बाहेरून बसवलेला भाग असल्याने त्याभोवती शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया होऊ शकते. काही वेळा स्टेंटच्या आसपास नवीन टिश्यू म्हणजेच अतिरिक्त पेशींची वाढ होते. कालांतराने या वाढलेल्या टिश्यूमुळे रक्तवाहिनी पुन्हा अरुंद होण्याची शक्यता असते.
स्टेंट बसवल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली अँटी-प्लेटलेट औषधं नियमितपणे घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही औषधं रक्तामध्ये गाठी तयार होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात. काही रुग्णांना ही औषधं दीर्घकाळ घ्यावी लागू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं बंद करू नयेत. औषधं कधी कमी करायची किंवा बंद करायची याचा निर्णय डॉक्टरच घेतात.
स्टेंट बसवल्यानंतर फक्त औषधं घेणं पुरेसं नाही. जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही धूम्रपान पूर्णपणे बंद करणं, आहारातून ट्रान्स फॅट आणि जास्त मीठ कमी करणं त्याचप्रमाणे नियमित शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करणं आवश्यक आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
स्टेंट बसवल्यानंतर चालताना त्रास होणं, छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं जाणवत असतील तर ती दुर्लक्षित करू नयेत. ही लक्षणं पुन्हा रक्तवाहिनीत गंभीर ब्लॉकेज झाल्याचे संकेत असू शकतात. काही वेळा हे ब्लॉकेज ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
स्टेंट बसवल्यानंतर त्याची स्थिती आणि रक्तवाहिनीत पुन्हा अरुंदपणा निर्माण झाला आहे का, हे तपासण्यासाठी डॉक्टर आवश्यकतेनुसार विविध चाचण्या सुचवू शकतात. त्यापैकी CT कोरोनरी अँजिओग्राफी ही आधुनिक तपासणी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे स्टेंट बसवल्यानंतर उपचार संपले असं समजणं योग्य नाही. नियमित तपासणी, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवर घेणं, धूम्रपान टाळणं, योग्य आहार घेणं आणि नियमित शारीरिक हालचाल करणं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.