

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयाचं आरोग्य जपणं फार गरजेचं आहे. अगदी कमी वयातही हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या घटना समोर येतायत. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासोबतच आपण रोज काय खातो याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हृदय निरोगी ठेवायचं असेल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या माहितीनुसार, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
आजतकच्या वेबसाईटला माहिती देताना दिल्लीतील कैलाश दीपक रुग्णालयाचे असोसिएट कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. मोहित अरोरा यांच्या मते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, काही पदार्थ नियमित आहाराचा भाग केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते. हे 6 पदार्थ कोणते आहेत ते पाहूयात.
राजमा, चणे, मसूर यांसारख्या कडधान्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे हे पदार्थ पचायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊ शकते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही कडधान्यांचा फायदा होतो.
सफरचंद, द्राक्षं आणि संत्री यांसारखी फळं आहारात घेतल्याने फायदा होतो. त्यासोबत भेंडी आणि वांगी यांचाही आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. हे फायबर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फळं आणि भाज्या नियमित खाणं फायदेशीर ठरू शकतं.
ओट्स, जव आणि इतर संपूर्ण धान्यांमध्ये विरघळणारे फायबर म्हणजेच सोल्युबल फायबर असतं. हे फायबर पचनसंस्थेत कोलेस्ट्रॉल शरीरात शोषलं जाण्यापूर्वी त्यावर काम करण्यास मदत करतं. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. रोजच्या आहारात ओट्स, जव किंवा इतर संपूर्ण धान्यांचा समावेश करणं त्यामुळे उपयुक्त ठरू शकतं.
स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल, सनफ्लॉवर तेल आणि कॅनोला तेल यांसारख्या तेलांचा वापर करता येतो. यांचा वापर करताना त्याचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे. बटर किंवा तुपाऐवजी अशा तेलांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आहारातील सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.
बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे यांसारख्या नट्समध्ये शरीरासाठी उपयुक्त असलेले हेल्दी फॅट्स असतात. मात्र त्यांचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मर्यादित प्रमाणात बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते.
सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. ओमेगा-३ मुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे फॅटी फिशचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.