

ज्याप्रमाणे डिहायड्रेशन धोकादायक असत त्याचप्रमाणे शरीराच्या काही भागांमध्ये अतिरिक्त पाणी साठणं देखील तितकंच धोकादायक असू शकतं. लोक अनेकदा अचानक पोट फुगणं किंवा धाप लागणं याला एक किरकोळ समस्या समजतात. परंतु हे देखील शरीरात पाणी साठल्याचं लक्षण असू शकतं. डॉक्टरांच्या मते, पोट आणि हृदयाभोवती पाणी साठणं हे गंभीर आरोग्य समस्यांचं लक्षण असू शकतं, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं.
क्लीव्हलँड क्लिनिक वेबसाईटच्या माहितीनुसार, पोटात पाणी साठण्याच्या स्थितीला 'ॲसाइटिस' (ascites) म्हणतात. ही स्थिती सामान्यतः लिव्हर सिरोसिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते. ज्यावेळी लिव्हर खराब होऊ लागतं त्यावेळी शरीरातील मीठ आणि पाण्याचं संतुलन बिघडतं. अशावेली हळूहळू, पोटात पाणी जमा होऊ लागतं, ज्यामुळे पोटाचा आकारही नेहमीपेक्षा मोठा दिसतो. या लक्षणांमध्ये वेगाने वजन वाढणं, घोट्यांना सूज येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पोटदुखी आणि थकवा यांचाही समावेश असू शकतो.
डॉक्टरांच्या मते, काही रोजच्या सवयींमुळे हा धोका वाढू शकतो. अति मद्यपान करणे, हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या आजारांवर वेळेवर उपचार न करणं आणि लिव्हरच्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणे यामुळे सिरोसिस होऊ शकतो आणि परिणामी पोटात पाणी साठू शकतं. संशोधनात असंही आढळून आलंय की, यकृताचे गंभीर आजार हे एसाइटिसच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत.
हृदयाजवळ पाणी जमा होण्याच्या स्थितीला पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात. हृदयाभोवतीच्या भागात अतिरिक्त द्रव जमा झाल्यावर हे घडतं. सुरुवातीला याची लक्षणं सौम्य असू शकतात परंतु जसजशी समस्या वाढत जाते तसतसं छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, हृदयाचे ठोके वाढणं, चक्कर येणं आणि तीव्र अशक्तपणा जाणवू शकतो.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, इन्फेक्शनवर उपचार करण्यास विलंब करणं, गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करणं आणि हृदय, किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांवर वेळेवर उपचार न घेणं यामुळे पेरिकार्डियल इफ्युजनचा धोका वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये, ही स्थिती जीवघेणी देखील ठरू शकते.
डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला पोटाचा आकार वाढणं, अचानक वजन वाढणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत सतत दुखणं यांसारखी लक्षणं आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. लवकर निदान आणि उपचारांमुळे ही समस्या गंभीर होण्यापासून टाळता येऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.