Surabhi Jayashree Jagdish
आजकाल जिममध्ये व्यायाम करताना किंवा खेळताना अचानक हार्ट अटॅक आल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. अनेकदा लोक डोकं हलकं होणं, जास्त थकवा येण किंवा श्वास लागणं याकडे सामान्य समस्या म्हणून पाहतात. परंतु हेच संकेत शरीराकडून मिळणारे धोक्याचे इशारे असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. हे संकेत वेळेत ओळखले तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. व्यायाम करताना दिसणारी अशीच काही महत्त्वाची लक्षणं जाणून घेऊया.
व्यायाम करताना अचानक चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं हे सामान्य समजू नये. हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि अशी समस्या निर्माण होऊ शकते.
व्यायाम करताना थोडासा दम लागणं सामान्य आहे. पण कोणतंही विशेष कारण नसताना जास्त श्वास लागणं किंवा श्वास घेण्यास अडचण निर्माण होणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
अतिशय कमी काम केल्यानंतरही शरीरात प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक लोकांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी नेहमीपेक्षा अधिक थकवा जाणवू लागतो.
व्यायाम करताना घाम येणं स्वाभाविक आहे. मात्र अचानक थंड घाम फुटणं किंवा शरीर पूर्णपणे भिजेपर्यंत घाम येणं हे धोक्याचं चिन्ह असू शकतं. अशावेळी हृदयावर जास्त ताण येत असल्याचं मानलं जातं.
हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं. पण काही वेळा ही वेदना डाव्या हातात, घशात किंवा जबड्यातही जाणवू शकते. व्यायाम करताना या भागांमध्ये वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता वाटत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.