Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक म्हणजे अचानक छातीत तीव्र वेदना होणं आणि व्यक्ती कोसळणं, असाच विचार आपण करतो. मात्र डॉक्टरांच्या मते, अनेक वेळा हार्ट अटॅक अगदी शांतपणे शरीरात घडत असतो.
याची लक्षणं इतकी सामान्य असतात की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाठदुखी, जबड्यात वेदना, अपचन, थकवा किंवा श्वास लागणे यासारखी लक्षणंही ‘सायलेंट हार्ट अटॅक’ची चिन्हं असू शकतात.
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये नेहमीसारखी तीव्र छातीत दुखण्याची लक्षणं दिसत नाहीत. अनेक रुग्ण पाठदुखी, खांद्यात वेदना, पोटात दुखणे किंवा जबड्यात त्रास यासारख्या तक्रारी घेऊन येतात. त्यामुळे अनेकजण ते अॅसिडिटी, ताण किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, जवळपास 45 टक्के हार्ट अटॅक लोकांच्या लक्षातच येत नाहीत. पण असे हार्ट अटॅक तितकेच धोकादायक ठरू शकतात. वेळेत निदान न झाल्यास हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि अचानक मृत्यूचाही धोका वाढू शकतो.
महिलांमध्ये लक्षणं वेगळी दिसतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नसांवर परिणाम झाल्यामुळे छातीत दुखणं जाणवत नाही. वृद्ध व्यक्ती श्वास लागणे किंवा अपचन याला वयामुळे होणारा त्रास समजतात आणि त्यामुळे खरी समस्या लक्षात येत नाही.
शरीरात होणाऱ्या छोट्या बदलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अचानक जास्त थकवा येणं, चक्कर येणं, श्वास लागणं किंवा शरीरात अस्वस्थता जाणवणं ही लक्षणं विशेषतः धोकादायक गटातील लोकांनी दुर्लक्षित करू नयेत.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये रोजच्या स्वयंपाकात वापरलं जाणारं तेल बदलणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लोक साखर आणि मीठाकडे लक्ष देतात पण तेलाकडे दुर्लक्ष करतात.