Surabhi Jayashree Jagdish
आजकाल थकवा, सतत तहान लागणं किंवा त्वचेच्या छोट्या-मोठ्या समस्या या गोष्टी अनेकजण सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, ही लक्षणं शरीरात वाढलेल्या ब्लड शुगर वाढल्याची चिन्हं असू शकतात. ही लक्षणं काय आहेत ते पाहूयात.
सतत थकवा जाणवणे हे त्यातील एक प्रमुख लक्षण मानलं जातं. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटत असेल तर रक्तातील साखर पेशींमध्ये व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळे असा त्रास होऊ शकतो.
वारंवार तहान लागणे आणि लघवी होणं ही देखील महत्त्वाची चिन्हं आहेत. रक्तात साखरेचं प्रमाण वाढल्यावर किडनी ते बाहेर टाकण्यासाठी अधिक मेहनत घेते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढते आणि सतत तहान लागते.
दृष्टी धूसर होणं हेही दुर्लक्षित न करण्यासारखं लक्षण आहे. रक्तातील साखरेत अचानक बदल झाल्यास डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो आणि काही वेळासाठी दिसणं धूसर होऊ शकतं. अशी समस्या वारंवार होत असेल तर रक्तशर्करा तपासून घेणं गरजेचं आहे.
जखमा किंवा कापलेल्या जागा उशिरा भरून येणं हेही वाढलेल्या साखरेचं संकेत असू शकतात. कारण हाय ब्लड शुगरमुळे रक्तप्रवाह आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे जखमा भरायला वेळ लागतो.
वारंवार डोकेदुखी होणं यामागेही रक्तातील साखरेतील चढ-उतार कारणीभूत असू शकतात. कोणतंही स्पष्ट कारण नसताना सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
हात-पायांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणं किंवा जळजळ होणं हीदेखील सुरुवातीची गंभीर चिन्हं मानली जातात. दीर्घकाळ रक्तातील साखर वाढलेली राहिल्यास नसांवर परिणाम होऊन डायबेटिक न्युरोपॅथीचा धोका निर्माण होतो.
वजनात अचानक बदल होणं हेही महत्त्वाचं लक्षण आहे. काही लोकांचं वजन अचानक कमी होतं, तर काहींमध्ये पोटाजवळ चरबी वाढू लागते. शरीराला ग्लुकोज योग्य प्रकारे वापरता न आल्याने असा बदल दिसून येतो.