

अनेकांची अशी समजूत आहे की, कॅन्सर हा एक असा आजार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरात तयार होतो. आपल्या शरीरातील काही पेशी या अनियंत्रितपणे वाढू लागल्या की कॅन्सरची सुरूवा होतो. मातर आता शास्त्रज्ञांना एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर सापडला. हा कॅन्सर एका माशापासून दुसऱ्या माशात पसरतो.
'नेचर' या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनात ब्राउन बुलहेड कॅटफिश या माशामध्ये हा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आढळल्याची माहिती देण्यात आलीये. हे मासे अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील लेक मेम्फ्रेमागॉग या गोड्या पाण्याच्या तलावात आढळतात.
संशोधकांच्या मते, या माशांमध्ये आढळलेला मेलानोमा (त्वचेशी संबंधित कॅन्सरचा एक प्रकार) प्रत्येक माशाच्या शरीरात स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. तर कॅन्सरच्या जिवंत पेशी एका माशाकडून दुसऱ्या माशामध्ये गेल्या असून त्यांची वाढ झालीये. माशांमध्ये आढळलेला हा जगातील पहिला संसर्गजन्य (Transmissible) कॅन्सर मानला जातोय.
एखाद्या प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या निरोगी पेशींमध्ये काही काळानंतर जेनेटीक बदल होतात. या पेशींची वाढ ज्यावेळी नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा कॅन्सरची सुरुवात होते. काही दिवसांनी या कॅन्सरच्या पेशी पसरून आजूबाजूच्या अवयवांना प्रभावित करतात.
संशोधकांनी पहिल्यांदा आजारी आणि निरोगी माशांच्या ऊतींचं (टिश्यू) त्याचप्रमाणे ट्युमरच्या जीनोमची तपासणीा केली. या तपासणीत वेगवेगळ्या माशांच्या ट्युमरमधील जनुकीय रचना एकमेकांशी खूपच मिळती-जुळती असल्याचं दिसून आलं. मात्र त्याच माशांच्या निरोगी पेशींशी ती जुळत नव्हती.
लाखो जनुकीय बदलांपैकी अनेक बदल वेगवेगळ्या माशांच्या ट्युमरमध्ये सारखेच आढळले पण निरोगी पेशींमध्ये ते नव्हते. त्यामुळे हे ट्युमर प्रत्येक माशामध्ये स्वतंत्रपणे तयार झाले नसून एका मूळ कॅन्सरच्या पेशींपासून तयार झाले असल्याचा ठोस पुरावा संशोधकांना मिळाला.
हा कॅन्सर एका माशाकडून दुसऱ्या माशामध्ये नेमका कसा पसरतो, याचं निश्चित उत्तर अद्याप संशोधकांना मिळालेलं नाही. मात्र माशांच्या वर्तनाचा अभ्यास करून त्यांनी काही शक्यता मांडल्या आहेत. त्यातील पहिली शक्यता प्रजननाच्या सिझनशी संबंधित आहे. या काळात मोठ्या संख्येने मासे एकाच ठिकाणी जमा होतात आणि एकमेकांच्या अगदी जवळ येतात. त्यामुळे कॅन्सरच्या जिवंत पेशींना एका माशातून दुसऱ्या माशामध्ये जाण्याची संधी मिळू शकते.
या संशोधनानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र सध्या उपलब्ध वैज्ञानिक माहितीनुसार हा कॅन्सर माणसांमध्ये पसरतो असा कोणताही पुरावा नाही. हे संशोधन केवळ ब्राउन बुलहेड कॅटफिश या माशांवर करण्यात आलं असून संशोधकांनी माणसांसाठी कोणताही धोका असल्याचं स्पष्ट केलं नाही.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.