
झोप मेंदूच्या तरुणाईसाठी अत्यंत आवश्यक आहे
खराब झोपेमुळे मेंदू वेळेपूर्वी वृद्ध होतो
२७,००० लोकांवर झाला हा अभ्यास
आपल्या आयुष्याचा जवळपास एक तृतीयांश भाग आपण केवळ झोपेत घालवतो. हे ऐकायला थोडं जरी अती वाटलं तरीही झोप शरीर आणि मेंदू दोन्हीसाठी तितकीच आवश्यक आहे जितकं अन्न खाणं किंवा श्वास घेणं. झोप ही फक्त आराम करण्याची वेळ नसून शरीरातील थकलेल्या पेशी दुरुस्त करण्याचा आणि मेंदूला निरोगी ठेवण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
नुकत्याच झालेल्या एका मोठ्या अभ्यासातून हे समोर आलंय की, ज्यांची झोप नीट नव्हती अशा लोकांच्या मेंदूचं वय त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त दिसत होतं. म्हणजेच त्यांचा मेंदू वेळेपूर्वीच वृद्ध होत असल्याचं संकेत यावेळी जाणवले.
युनायटेड किंगडममध्ये 40 ते 70 वयोगटातील 27,000 हून अधिक लोकांच्या झोपेच्या सवयी आणि मेंदूच्या एमआरआय स्कॅनचे विश्लेषण करण्यात आलं. यावेळी तज्ज्ञांना या अभ्यासातून परिणाम धक्कादायक दिसून आले. ज्यांची झोपेची गुणवत्ता खराब होती त्यांच्या मेंदूचं वय त्यांच्या मूळ वयापेक्षा खूप जास्त आढळलं.
जसं शरीर वयानुसार बदलत जातं आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात त्याचप्रमाणे मेंदूतही वयोमानानुसार बदल होतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा मेंदू एकसारख्या गतीने वृद्ध होत नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वैज्ञानिक आता मेंदूचं जैविक वय ओळखू शकतात. या प्रक्रियेत मेंदूतील टिश्यूंची घनता, मेंदूच्या बाहेरील थराची जाडी आणि रक्तवाहिन्यांची स्थिती तपासली जाते.
या अभ्यासात 1,000 पेक्षा जास्त एमआरआय सिग्नल्स (इमेजिंग मार्कर्स) चं परीक्षण करण्यात आले. मशीन लर्निंग मॉडेलला पूर्णपणे निरोगी लोकांच्या डेटावर प्रशिक्षित करण्यात आलं आणि नंतर इतर सहभागींशी त्याची तुलना करण्यात आली. यातून असं आढळलं की, ज्यांची झोप नीट नव्हती, त्यांच्यात मेंदूचं वय त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त होतं.
याचा अर्थ असा की, चुकीची आणि अपुरी झोप मेंदूला वेळेपूर्वी वृद्ध करू शकते ज्यामुळे भविष्यात स्मरणशक्ती कमी होणं, डिमेंशिया आणि अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.
या संशोधनात झोपेचे खालील पाच घटक तपासले गेले:
व्यक्तीचा क्रोनोटाइप
दररोज किती तास झोप घेतात
निद्रानाश किंवा झोप येण्यात अडचण
घोरणं
दिवसभर खूप झोप येणं किंवा सतत थकवा जाणवणं
या सर्व गोष्टी एकत्र करून Healthy Sleep Score तयार करण्यात आला. ज्यांच्याकडे या पाचपैकी चार किंवा पाच गोष्टी चांगल्या होत्या त्यांची झोप सर्वोत्तम आढळली. पण ज्यांच्याकडे फक्त एक किंवा दोन चांगले घटक होते त्यांच्यात मेंदूचं वय सर्वाधिक वाढलेलं आढळलं.
अभ्यासादरम्यान सहभागींच्या रक्ताचे नमुनेही तपासण्यात आले. त्यातून असं स्पष्ट झालं की, खराब झोप शरीरात Inflammation वाढवते. हे Inflammation मेंदूच्या वृद्धत्व प्रक्रियेत जवळजवळ 10% कारणीभूत आहे. म्हणजेच झोप बिघडली तर शरीरात सूज वाढते आणि त्यामुळे मेंदू लवकर वृद्ध होतो.
वैज्ञानिकांच्या मते, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास झोपेची गुणवत्ता खूपच सुधारू शकते.
झोपण्यापूर्वी कॅफेन, मद्यपान आणि मोबाईल/टीव्ही स्क्रीनपासून दूर राहा.
खोलीत शांत, अंधार आणि आरामदायी वातावरण तयार करा.
दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.
या छोट्या बदलांमुळे फक्त झोप सुधारत नाही, तर मेंदूही अधिक काळ तरुण राहतो
खराब झोपेचा मेंदूवर काय परिणाम होतो?
मेंदू वेळेपूर्वी वृद्ध होतो.
मेंदूचे वय कसे मोजले गेले?
एमआरआय स्कॅन आणि मशीन लर्निंगने मोजले.
झोपेचे पाच महत्त्वाचे घटक कोणते?
झोपेचा कालावधी, क्रोनोटाइप, घोरणे इत्यादी.
झोप सुधारण्यासाठी काय करावे?
नियमित वेळी झोपा आणि स्क्रीनपासून दूर रहा.
खराब झोपेमुळे शरीरात काय वाढते?
शरीरात सूज (इन्फ्लेमेशन) वाढते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.