

कॅन्सरशी लढताना जीव वाचवणं महत्त्वाचं होतंच पण एका 19 वर्षांच्या तरुणासाठी आणखी एक मोठी समस्या होती. ही समस्या म्हणजे भविष्यात स्वतःचं बायलॉजिकल मूल होईल का? मात्र मुंबईतील डॉक्टरांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. कॅन्सरमुळे वृषण काढून टाकल्यानंतर त्यामधून तब्बल 23 जिवंत शुक्राणू शोधून ते सुरक्षित जतन करण्यात डॉक्टरांना यश आलं. त्यामुळे या तरुणाचं भविष्यात बाबा होण्याचं स्वप्न जिवंत राहिलंय.
मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये या तरुणावर उपचार सुरू होते. त्याला टेस्टिक्युलर (वृषणाचा) कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, त्याचं एकमेव उरलेलं टेस्टिस काढून टाकणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याचा जीव वाचला असता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर शरीरात पुढे स्पर्म्स तयार होणं कायमचं बंद झालं असतं.
याच कारणामुळे डॉक्टरांनी वेगळा मार्ग निवडला. 25 जुलै 2026 रोजी सर्जन युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, फर्टिलिटी तज्ज्ञ आणि एम्ब्रायोलॉजिस्ट अशा 10 डॉक्टरांच्या टीमने एक विशेष मोहीम राबवली. शस्त्रक्रियेनंतर काढलेल्या वृषणामध्ये जिवंत स्पर्म्स आहेत का याचा त्यांनी शोध घेतला. अखेर त्यांना 23 जिवंत स्पर्म्स सापडले. हे सर्व स्पर्म्स फ्रिज करण्यात आले.
या तरुणाला जन्मतःच 'क्रिप्टॉर्किडिझम' हा आजार होता. या आजारात टेस्टिस म्हणजेच वृषण जन्मापूर्वी योग्य ठिकाणी येत नाहीत आणि पोटातच राहतात. तो फक्त एका वर्षाचा असताना त्याच्यावर ऑर्किओपेक्सी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी एक टेस्टिस पूर्णपणे खराब झाल्यामुळे ते काढून टाकावं लागलं. मात्र दुसरं वृषण डॉक्टरांनी योग्य जागी आणण्यात यश मिळवलं.
काही वर्षांनी या उरलेल्या वृषणाला सूज आली. तपासणीत त्यामध्ये मोठी गाठ असल्याचं समोर आलं. ही गाठ इतकी वाढली होती की जवळपास 95 टक्के टेस्टिस कॅन्सरग्रस्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे ते काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी वीर्याचे नमुने तपासले. AI असिस्टेडच्या मदतीने तपासणी करूनही एकही स्पर्म सापडला नाही. यानंतर डॉक्टरांनी 'एक्स-व्हिवो ऑनको-टीईएसई' (Ex-vivo Onco-TESE) ही दुर्मिळ पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत शरीरातून काढलेल्या टेस्टिसमधून स्पर्म्स शोधले जातात.
25 जुलै रोजी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांकडे फक्त पाच ते सहा तासांचा वेळ होता. या कालावधीत जिवंत स्पर्म्स शोधणं आवश्यक होतं. डॉक्टरांनी तासन्तास तपासणी केली. अखेर त्यांना पहिला जिवंत स्पर्म्स सापडला. त्यानंतर शोध सुरूच ठेवला आणि एकूण 23 जिवंत स्पर्म्स मिळाले. हे सर्व स्पर्म्स त्याच्या भविष्यासाठी सुरक्षित फ्रिज करण्यात आले.
टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना हॉस्पिटलच्या डॉ. फिरुझा पारिख यांनी सांगितलं, "रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. पण त्याचबरोबर त्याला भविष्यात स्वतःचं बॉयोलॉजिकल चाईल्ड होण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही प्रत्येक शक्यता तपासली.सामान्यतः एका पुरुषाच्या शरीरात लाखो शुक्राणू असतात. त्याच्या तुलनेत 23 ही संख्या कमी वाटू शकते. पण या प्रत्येक शुक्राणूमागे अनेक तासांची मेहनत आणि एका तरुणाच्या भविष्यातील आशा दडलेली आहे."
भविष्यात हा तरुण लग्नानंतर मूल होण्याचा निर्णय घेतल्यास हे फ्रिज केलेले स्पर्म्स आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरता येतील. त्यामुळे त्याला स्वतःचं मूल होण्याची संधी मिळू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.