High Cholesterol: या ठिकाणी वेदना होत असतील तर सावध व्हा; शरीर देतंय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

छातीत कळ, दम लागणे, थकवा किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे हाय एलडीएल कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात. वेळेत तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
High Cholesterol
High CholesterolSAAM TV
Published On

तुमच्या छातीत अधूनमधून हलकी कळ, टोचल्यासारखं किंवा दडपण आल्यासारखं वाटतं का? अनेकजण असा त्रास झाला की, तो गॅसचा असेल किंवा साधा स्नायू दुखत असेल, असं समजून दुर्लक्ष करतात. मात्र काही वेळा हा त्रास वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.

आजकाल बदलती जीवनशैली, तेलकट आणि जंक फूडचं वाढलेलं सेवन, सततचा ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढतेय. सुरुवातीला याची लक्षणं फार गंभीर वाटत नसल्यामुळे अनेकजण तपासणी किंवा उपचाराकडे दुर्लक्ष करतात. पण हीच चूक पुढे मोठ्या समस्येचं कारण ठरू शकते.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिनय पांडे यांच्या मते, कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलं तरी अनेकजण ते आपोआप कमी होईल, असा समज करून घेतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अनेकदा छातीत तीव्र वेदना किंवा हार्ट अटॅक येईपर्यंत लोकांना आजाराची गंभीरता समजत नाही. मात्र त्याआधी शरीर काही संकेत देत असतं. हे संकेत वेळेत ओळखून योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.

High Cholesterol
Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं की कोणती लक्षणं दिसून येतात?

शरीरात वाईट म्हणजेच एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल वाढलं की, ते हळूहळू रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचू लागतं. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयावर ताण येऊ लागतो. अशावेळी थोडंसं काम केलं तरी पटकन थकवा येऊ शकतो. अगदी हलकं चाललं किंवा रोजची कामं केली तरी धाप लागू शकते.

जिना चढताना छातीत जडपणा जाणवणं किंवा दम लागणं ही देखील महत्त्वाची लक्षणं असू शकतात. अनेकांना सतत अशक्तपणा जाणवतो. काही जणांना मान, खांदे, जबडा किंवा डाव्या हातात हलकं दुखणं, ताण किंवा जकडल्यासारखं वाटू शकतं. काही वेळा छातीत हलकी कळ, टोचल्यासारखी वेदना किंवा दडपणही जाणवू शकतं.

High Cholesterol
Trump Tariff Impacts: ट्रम्प यांनी जनेरिक औषधांवर लावला २०० टक्के टॅरिफ, भारतातील कंपन्यांवर काय परिणाम होणार?

काही रुग्णांमध्ये पाय दुखणं, त्वचेवर पिवळसर रंगाचे छोटे गाठीसारखे डाग दिसणं किंवा वारंवार चक्कर येणं अशी लक्षणंही दिसू शकतात. ही लक्षणं शरीरातील रक्तप्रवाह नीट होत नसल्याचा इशारा असू शकतात. विशेषतः हृदयापर्यंत पुरेसं रक्त पोहोचण्यात अडथळा निर्माण होत असल्याचंही त्यातून सूचित होऊ शकतं.

डॉक्टरांच्या मते, संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, धूम्रपानापासून दूर राहणं आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं या सवयी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. शरीर देत असलेल्या छोट्या-छोट्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर ती साधी समजून दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

High Cholesterol
Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com