मंडळी, रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. वेळेअभावी झटपट होणाऱ्या पोहे, उपमा, शिरा यापुढे गाडी जात नाही. पण तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा पण येतो ना राव.. मग दडपे पोहे नक्की बनवून पाहा. कांदे पोह्यात कांदा हिरो असतो मात्र यात नारळ हिरो असतो. यामुळे पोट आणि मन दोन्ही तृप्त.करायलाही एकदम सोपे.
दडपे पोहे बनवण्यासाठी काय साहित्य लागतं?
पातळ पोहे दोन वाट्या, पाव वाटी शेंगदाणे, एक नारळ, एक मोठा कांदा (Onion) एक टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लिंबू
दडपे पोह्याची कृती
एका मोठ्या पातेल्यात पातळ पोहे चाळून घ्या. त्यात नारळ फोडून त्यातलं साधारण पोहे भिजतील इतकंच पाणी घाला. या व्यतिरिक्त पाणी वापरू नये. एक अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. चवीपुरतं मीठ (salt)घाला. थोडीशी साखर घाला. त्यात बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेला टोमॅटो तसंच चिरलेली कोथिंबीर टाकून मिश्रण एकत्र करून घ्या.
त्यानंतर ते झाकून ठेवा. आता फोडणीची तयारी करू. फोडणीच्या भांड्यात तेल(Oil) तापवून घ्या त्यात आधी शेंगदाणे घाला म्हणजे ते छान तळले जातात. थोड्या वेळाने त्यात मोहरी, जिरं, हिंग टाका. कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला आणि खमंग फोडणी त्या पोह्यांच्या मिश्रणावर पसरून टाका आणि पुन्हा पाच मिनिटं झाकून ठेवा. नंतर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्वांना खायला द्या.
हे पोहे खूप चवीष्ट बनतात. काही जण यात उकडलेला बटाटा(Potato) किसलेलं गाजर, मक्याचे वाफवलेले दाणेही घालतात. या पोह्यांवर पिवळी शेव टाकून खाल्ले तरी मस्त लागतात. पौष्टीक आणि जिभेवर रेंगाळणारी चव असल्यानं लहानमोठे सर्वच हे पोहे लगेच फस्त करतात. तिखट, गोड, आंबट चव त्यात नारळाच्या पाण्यात भिजवलेले असल्यानं दडपे पोहे खाण्याचा अनुभव शब्दातीत आहे. तो तुम्हाला घ्यायचा असेल तर दडपे पोहे नक्कीच करून पाहा..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.