

घरच्याघरी हॉटेलसारखे पंजाबी छोले खायचे असतील तर ही रेसिपी संपूर्ण वाचाच. उत्तर भारतात खास लोकप्रिय असलेले पंजाबी छोले आता अनेकांच्या स्वयंपाकघरात आवडीचे पदार्थ झाले आहेत. मसाल्यांचा खास सुगंध, दाट ग्रेव्ही आणि मऊ शिजलेले छोले यामुळे हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो.
पंजाबी छोले तयार करण्यासाठी सर्वप्रथम रात्रभर भिजवलेले छोले प्रेशर कुकरमध्ये घ्यावेत. त्यामध्ये आले, सुकी कश्मिरी लाल मिरची, तेजपत्ता, दालचिनी, हळद, देगी लाल तिखट, मीठ, तूप आणि आवश्यक तेवढे पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवावे. शिजल्यानंतर थोडेसे छोले कुस्करून वेगळे ठेवल्यास ग्रेव्ही जास्त घट्ट आणि चविष्ट होते.
यानंतर खास पंजाबी मसाला तयार करावा. त्यासाठी धणे, काळी व हिरवी वेलची, मिरी, जिरे, लवंग, जावित्री, अजवायन, हिंग आणि बेडगी लाल मिरची हलक्या आचेवर कोरडी भाजावी. त्यात डाळिंबा दाणे, कसुरी मेथी आणि मीठ घालून मिश्रण मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. हाच मसाला पंजाबी छोल्यांना खास चव देतो.
आता कढईत तेल आणि तूप गरम करून त्यात जिरे फोडणीस घालावेत. लसूण, आले आणि किसलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतावे. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या आणि तयार मसाला घालून थोडावेळ शिजवावे. यामध्ये हळद, लाल तिखट आणि फेटलेले दही घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परतावे. आता शिजवलेले छोले आणि आवश्यक तेवढे पाणी घालून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून शिजवावे.
शेवटी चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालून छान ढवळून घ्या. तयार झालेले पंजाबी छोले सुगंधी, दाट आणि चवीला एकदम रेस्टॉरंट स्टाइल लागतात. गरमागरम भटूरा, पुरी किंवा चपातीसोबत हे छोले जेवणाची मजा दुप्पट होते. घरच्या घरी खास पंजाबी स्वाद अनुभवायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.