

जेवणात मीठ नसेल तर पदार्थाची चव काहीशी फिकी वाटते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात मिठाचा वापर होतोच. मात्र चव वाढवण्यासाठी मीठ किती वापरतोय याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारात गरजेपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचा प्रयत्न करावा. हे प्रमाण साधारण एका छोट्या चमच्यापेक्षाही कमी आहे. 5 ग्रॅम मिठातून जवळपास 2000 मिलिग्रॅम सोडियम शरीरात जातं. त्यामुळे रोजच्या आहारात मिठाचं प्रमाण किती आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मिठामध्ये असलेलं सोडियम शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राखणं तसंच शरीरातील अनेक महत्त्वाची कामं सुरळीतपणे होण्यासाठी सोडियमची गरज असते. मात्र एखादी गोष्ट शरीरासाठी आवश्यक आहे म्हणून ती जास्त प्रमाणात घेतली तरी चालते असं नाही. सोडियमचं प्रमाण गरजेपेक्षा वाढलं तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
WHOच्या माहितीनुसार, जगभरात लोक दररोज सरासरी 4278 मिलिग्रॅम सोडियम म्हणजेच साधारण 11 ग्रॅम मीठ घेतात. हे WHOने सुचवलेल्या दैनंदिन मर्यादेच्या दुप्पटपेक्षाही जास्त आहे.
आहारातून सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर सर्वात आधी त्याचा संबंध उच्च रक्तदाबाशी जोडला जातो. दीर्घकाळ रक्तदाब वाढलेला राहिल्यास त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो आणि त्यातून पुढे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारातील मिठाचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.
दीर्घकाळ जास्त प्रमाणात सोडियम घेत राहिल्यास आणि त्यामुळे रक्तदाब वाढत राहिल्यास स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय WHOच्या माहितीनुसार जास्त सोडियम असलेल्या आहाराचा संबंध किडनीच्या आजारांसह अनेक आरोग्य समस्यांच्या वाढलेल्या धोक्याशी आहे.
जास्त सोडियमचं सेवन पोटाच्या कॅन्सरशी आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढण्याशीही जोडलेलं आहे. याशिवाय शरीरात सूज येण्याची समस्या आणि थायरॉइडशी संबंधित त्रास वाढू शकतात.
अनेकांना वाटतं की, आपण जेवताना वरून जास्त मीठ घेतलं तरच शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं. पण प्रत्यक्षात असं नाही.
आपण रोज खाणाऱ्या अनेक पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये आधीपासूनच सोडियम मोठ्या प्रमाणात असू शकतं. त्यामुळे वरून मीठ कमी घेतलं तरी अशा पदार्थांचं सेवन जास्त असेल तर शरीरात सोडियमचं प्रमाण वाढू शकतं.
फक्त जेवणात वरून किती मीठ टाकतो याचाच विचार न करता दिवसभरात आपण कोणते पदार्थ खातोय याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
WHOच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घ्यावं. हे प्रमाण साधारण एका छोट्या चमच्यापेक्षा कमी आहे. 5 ग्रॅम मीठ म्हणजे जवळपास 2000 मिलिग्रॅम सोडियम. म्हणून रोजच्या आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवणं आणि पॅकेज्ड पदार्थांमधून किती सोडियम शरीरात जातंय, याचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मिठाचं प्रमाण अचानक कमी करण्याऐवजी ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वयंपाक करताना नेहमीपेक्षा थोडं कमी मीठ वापरायला सुरुवात करा. काही दिवसांनी जिभेला कमी मिठाची चवही सहज स्वीकारता येते.
यासोबतच पॅकेज्ड आणि इन्स्टंट फूडचं सेवन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण अशा पदार्थांमध्ये आधीपासूनच सोडियम असण्याची शक्यता असतं.
सॉस, ड्रेसिंग आणि खूप खारट चटण्यांचा वापर मर्यादित ठेवा.
जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक वेळी जास्त मीठ वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी लिंबू, विविध मसाले आणि हर्ब्स यांचा वापर करून पदार्थाला चव देता येते.
थोडक्यात मीठ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसली तरी त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारातील छोट्या-छोट्या सवयी बदलल्यास शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त सोडियमचं प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.