मन, बुद्धी आणि वर्तन यांची सांगड कशी घालावी? वाचा सविस्तर

लहान वयात जशी हळू-हळू समज यायला लागते, अगदी तेंव्हापासून सगळ्यात जास्त जवळचा सवंगडी म्हणजे आपलं मन.
मन, बुद्धी आणि वर्तन यांची सांगड कशी घालावी? वाचा सविस्तर
मन, बुद्धी आणि वर्तन यांची सांगड कशी घालावी? वाचा सविस्तरSaam TV
Published On

योगिता तोडकर

(मनोलया कन्स्लटंटस)

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर,

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर....

बहिणाबाईंच्या या ओळी कोणालाच नवीन नाहीत, पण जितक्या वेळा त्या वाचू  तितक्या वेळा त्या नवीन वाटतात. इतक्या पूर्वीपासून मनावर एवढा सखोल अभ्यास का केला गेला असावा? मन आणि माणसाचा असा काय संबंध? मनाशिवाय माणूस बनणार तरी कसा? माणसाच्या व्यक्तिमत्वावर सामाजिक घटकांपेक्षा जास्त बुद्धीचा व मनाचा परिणाम होत असतो. मन आणि बुद्धी हि  सार्वजनिक मालमत्ता नसल्या कारणाने एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो?  याबद्दल काय विचार करतो? व त्यावर आधारित काय निर्णय घेतो हे  व्यक्तिसापेक्ष असते. व यावरआपले वर्तन ठरते, मन व बुद्धी याचा खूप महत्वाचा व मोठा कार्यभाग राहतो.

लहान वयात जशी हळू-हळू समज यायला लागते, अगदी तेंव्हापासून सगळ्यात जास्त जवळचा सवंगडी म्हणजे आपलं मन. सगळ्यात जास्त आपण आपल्या मनाशीच बोलतो. माणसाचं मन, त्याच्या इच्छा-आकांक्षा, वेदना, भावना, आवडी-निवडी यांनी बनलेलं असत. त्यामुळे ते आपल्याला खूप जवळच वाटत. परंतु व्यक्तिमत्व संतुलित असण्यासाठी मनाला बुद्धीची जोड असावी लागते. कारण माणसाची बुद्धी म्हणजे त्याच विचार करण्याचं साधन. ज्यामध्ये काही गोष्टींमधले फरक ओळखणे, नेमकी कारणे शोधणे, निर्णय घेणे अशा विविध गोष्टी चालू असतात. बुद्धी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थबोध करून देणारी एक कार्यशाळाच असते. आपल्या आयुष्यातल्या अगदी गर्भधारणेपासूनच्या प्रत्येक गोष्टीची ती नोंद ठेवत  असते. आपल्याबरोबर घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तिला माहिती असते. आपल्याला येणारे प्रत्येक अनुभव मग ते सकारात्मक असोत व नकारात्मक ते कायमस्वरूपी स्मृतीमध्ये साठवले जातात. त्याचप्रमाणे असणारी अडचण नेमकी काय आहे? त्याबद्दल आपल्याला नेमके काय वाटते? ती कशी सोडवता येईल? ती सोडवताना नेमके काय करावे लागेल या सगळ्या वर देखील काम चालते.

मन, बुद्धी आणि वर्तन यांची सांगड कशी घालावी? वाचा सविस्तर
Vastu Tips: या कारणांमुळे आर्थिक प्रगतीला ब्रेक लागतो, चुकूनही या गोष्टी करु नका

या सगळ्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मन, बुद्धी, शरीर, वर्तन यांच्या संबंधातील नेमकेपणा काय? एखादी घटना घडणे म्हणजे रोप लावणे. नंतर त्या रोपाला लागणारे खत, पाणी घालण्याचे काम मन करते. त्याच्यावर संस्कार करून योग्य ते घटक झाडाच्या विविध अवयवांना पोहचवण्याचे काम बुद्धी करते. त्याला मिळणारा प्रतिसाद म्हणजेच झाडाची वाढ व त्यानंतर हे सगळे योग्य रीतीने होत असेल तर ते झाड बहरते, फुलते. म्हणजेच मन, बुद्धी, शरीर हातात हात घालून चालत असतील तर वर्तनदेखील निश्चितपणे सहज असू शकते. थोडक्यात बोलायचे झाले तर एखाद्या परिस्थितीबद्दल माणसाला नेमके काय वाटते? त्याप्रमाणे तो विचार करतो, वर्तन करतो व त्याला अनुसरून माणसाचे शरीर प्रतिसाद देते. यालाच ‘माईंड बॉडी रिलेशन’म्हटले जाते. म्हणजेच मनाला झालेला अर्थबोध, त्याप्रमाणे शरीर प्रतिसाद देते. उदा तुम्ही जेंव्हा उदास असता किंवा घाबरलेले असता तेंव्हा तुमचे शरीर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कि काहीतरी चुकीचे घडत आहे.

माणसाचे वर्तन हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्याला अनुसरून त्याला आलेले अनुभव व दुसरे म्हणजे त्याला माणसाकडून दिला जाणारा प्रतिसाद. आयुष्यात कोणतीही घटना कशी व का घडावी यावर आपला पूर्णपणे ताबा नसतो, पण त्याला नेमका व काय प्रतिसाद द्यावा यावर पूर्णपणे असू शकतो. कोणत्याही प्रतिसादावर तो का द्यावा? यावर मन व बुद्धीचा अंकुश असतो.

मन, बुद्धी आणि वर्तन यांची सांगड कशी घालावी? वाचा सविस्तर
डेल्टा, ओमिक्रॉनंतर अजून किती कोरोना प्रकार; शास्त्रज्ञांनी दिली चेतावनी

मग निर्णय घेताना मनाच्या हवाली व्हावे कि बुद्धीच्या हवाली व्हावे हा प्रश्न निर्माण होतो. साधारणपणे माणसाने कोणतेही निर्णय बुद्धीने घ्यावेत, मानाने घेऊ नयेत असे म्हटले जाते. याचे कारण शोधताना असे दिसून येते कि जेंव्हा बुद्धीच्या मदतीने निर्णय घेतले जातात तेंव्हा एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्धपणे विचार केला जातो. त्यात भावनांना विशेषत्वाने स्थान दिले जात नाही. पण जेंव्हा मनाच्या आधारावर निर्णय घेतला जातो, तेंव्हा बहुतकरून तो भावनिक असतो. त्यामुळे तो एकांगी असू शकतो.

न्यूटनचा तिसरा नियम सांगतो कि प्रत्येक कृतीला तेवढीच व उलट प्रतिक्रिया असते. तोच नियम इथेपण लागू होतो. माणसाने निर्णय मनाने घेऊ देत अथवा बुद्धीने घेऊ देत, त्या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम निश्चितच समोर येतात. व हे परिणाम जेंव्हा माणूस पेलवू शकत नाही, तेंव्हा ताण निर्माण होतो. म्हणजेच त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते. जेंव्हा माणसाचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते तेंव्हा त्याला त्याचे वर्तन, विचार याबद्दलची पूर्ण कल्पना असते. तसेच त्याची स्वतःबद्दलची मत, भावना चांगल्या असतात. परंतु जेंव्हा त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडते तेंव्हा भावनांच्या प्रोसेसिंग मध्ये अडथळे निर्माण होतात. हे अडथळे शरीराची प्रतिकारक्षमता कमकुवत करतात. त्यामुळे आधीच भावनिक स्तरावर त्रस्त झालेला माणूस सर्दी किंवा अशाच कोणत्यातरी तत्सम आजारपणाला बळी पडतो. माणसाला ताण आलेला असताना त्याला व्यायाम करावासा वाटत नाही, चांगले खाण्याची इच्छा होत नाही. तसेच शारीरिक त्रास झाल्यावर औषधे घेण्याचीपण इच्छा होत नाही. ज्याचा परिणाम शरीरावर होतो.

एखादा निर्णय काल घेणे गरजेचे होते कि आज कि उद्या घ्यावा, यामध्ये माणसाचा जेंव्हा गोंधळ होऊ लागतो तेंव्हा ताण निर्माण होतो. जेंव्हाआपण मनाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा भावनांमुळं मन द्विधाअवस्थेत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. माणसाची निर्णय घेण्याचीक्षमता असूनदेखील योग्य वेळेला माणूस जर निर्णय घेऊ शकला नाही तर होणाऱ्या परिणामांना त्याला सामोरे जावे लागते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे ताणात भर पडणे.

जेंव्हा मन बुद्धीवरती वर्चस्व गाजवू लागते किंवा मन बुद्धीच्या ताब्यात राहत नाही तेंव्हा ताण निर्माण होतो. आपल्याबाबत एखादी घटना घडते तेंव्हा ती का घडली? कशी घडली? याचा विचार करणे गरजेचंअसते. तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल? निर्णयाचे फायदे-तोटे काय असतील हेदेखील पाहणे आवश्यक असते. परंतु एखादी घटना घडल्यावर नेमके काय घडत आहे याचे आकलन करून न घेता मन माणसाच्या विचारांची दिशाच बदलून टाकते व त्यामुळेआपण स्वतःला व नशिबाला दोष द्यायला सुरवात करतो. आणि परिस्थितीला गंभीर स्वरूप येते. त्याचप्रमाणे बऱ्याचदा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हतबद्ध झालेले मन, परिस्थिती आपोआप बदलेल व ज्यामुळे तणावयुक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे ते घटकआपोआप बदलले जावे असा आग्रह धरू लागते. म्हणजेच आपल्या आजूबाजूची परिस्थिती जेंव्हा शारीरिक,मानसिक, सामाजिक स्वास्थ्याला आव्हानात्मक ठरते तेंव्हा ताण निर्माण होतो. प्रत्येक माणसाच्या वर्तनावर भाव-भावनांचा, विचारांचा परिणाम होत असतो व माणसाचे वर्तन हाच समाजाचा चेहरा असतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com