

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. यासगळ्या बदलामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. लोक दिवसभर कामासाठी बाहेर असतात. त्यामुळे त्यांना व्यायामाला किंवा योग्य डाएट फॉलो करायला वेळ मिळत नाही. या सामान्य वाटणाऱ्या गोष्टी लोक सहसा दुर्लक्षित करत असतात. पण याने तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं.
काहींना असं वाटत असतं की, हार्ट अटॅक, डायबेटीज किंवा ब्लड प्रेशरचा त्रास हा अनुवांशिकतेने आपल्यापर्यंत येतो किंवा जास्त मीठ खाल्ल्यावर आपल्याला होऊ शकतो. पण मुळात असं नसतं. तुमच्या रोजच्या दैनंदिन सवयींमुळे तुम्हाला नकळत हाय ब्लड प्रशेरसारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतो. पुढे आपण याच सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.
हैदराबादमधील अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट Sudhir Kumar यांनी इकोनॉमिक टाइम्सच्या प्रसिद्ध केलेल्या लेखात याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये तुमच्या रोजच्या हालचालींवर किंवा कृतीवर आधी लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. कारण हाय ब्लड प्रेशर एका दिवसात होत नाही तर त्यासाठी तुमच्या काही सवयी कारणीभूत असतात.
ब्लड प्रेशरची मूळ कारणे
तज्ज्ञांच्या मते, अनेकांना गर्दीमुळे किंवा रोजच्या प्रवासामुळे येणारा ताण हे ब्लड प्रेशरचे कारण असू शकतं. कारण शहरांमधल्या गर्दीच्या रस्त्यांवर वाहन चालवताना सतत तणाव आणि अॅड्रेनालिनची पातळी वाढत राहते. त्याचमुळे रक्तदाबात वारंवार तात्पुरती वाढ होते. त्याचप्रमाणे जास्तीचे कामाचे तास, सततचा कामाचा ताण आणि दिवसभर बसून काम करण्याची सवयही हृदयविकाराचा धोका वाढवते.
काहीवेळेस एकटेपणामुळे तुमच्या शरीरातल्या सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम जास्त सक्रिय राहतात. त्यामुळे तुमचा बीपी वाढण्याची शक्यता असते. तसेच ९ ते १० तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांमध्येही रक्तदाबाचा धोका वाढल्याचं तज्ज्ञांना दिसलं आहे. शिवाय काहीलोक नियमित धुम्रपान करत असतील तर त्यांना ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.