

सध्या तरुणांमध्ये कमी वयातच काही गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यांच्या लाइफस्टाइलचा परिणाम शरीरावर होतो हे त्यांना फार उशीराच कळतं. पण तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते. वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि पाटणा येथे आयोजित परिषदांमध्ये डॉक्टरांनी वयाच्या १५व्या वर्षापासूनच तपासणी करावी असं सांगितलं. ही अत्यंत महत्वाची सुचना दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हाय ब्लड प्रेशर हा आजार सायलेंट किलर आहे. कारण बरीच वर्षे त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. अनेकांना स्ट्रोक, हार्ट अटॅक किंवा किडनी फेल झाल्यानंतरच आपल्याला हाय ब्लड प्रेशर असल्याचं समजतं. त्यात हा आजार लवकर बरा होत नाही. म्हणूनच तुम्ही तपासणी करणं गरजेचं आहे.
यापूर्वी हाय ब्लड प्रेशर हा फक्त वृद्धांमध्ये आढळणारा आजार होता. पण आता किशोरवयीन मुलं आणि तरुणांमध्येही हा धोका वाढत असल्याचं दिसतंय. यामागे बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. सारखा स्ट्रेस, अपुरी झोप, जंक फूडचं वाढतं सेवन, जास्त मीठ आणि प्रोसेस्ड पदार्थ, लठ्ठपणा तसेच शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमध्ये रक्तदाब वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसेच मधुमेह, थायरॉइडचे विकार, कौटुंबिक इतिहास आणि महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान होणारा उच्च रक्तदाब किंवा मेनोपॉजनंतर होणारे हार्मोनल बदलही महत्त्वाचं कारण ठरत आहेत.
डॉक्टरांनी सांगितलं की, सतत थकवा येणं, चक्कर येणं किंवा डोकंदुखी अशी लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, जर किशोरवयापासूनच नियमित BP तपासणी, पौष्टीक आहार, अर्धातास व्यायाम आणि चांगल्या झोपेची सवय लावली तर भविष्यात हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.