हिवाळा सुरू झाला की बाजारात ताजी हिरवेगार वाटाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होतात. वाटाण्याची भाजी, पुलाव, पराठे, कचोरी अशा विविध पदार्थांमध्ये वाटाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकजण एकाच वेळी दोन ते तीन किलो वाटाणे खरेदी करून ठेवतात. मात्र,वाटाणे खाण्यापेक्षा ते सोलण्याचे काम अनेकांना अधिक त्रासदायक वाटते. थोडीशे वाटाणे सोलण्यासाठीही बराच वेळ लागतो. अशावेळी जास्त प्रमाणात वाटाणे सोलायची असेल तर हातही दुखू लागतात.
पण आता काळजी करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातील काही सोप्या ट्रीक वापरून तुम्ही कमी वेळेत भरपूर वाटाणे सोलू शकता. विशेष म्हणजे, या पद्धतीमुळे वाटाणे सोलण्याचे कष्टही कमी होतात.
एका मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घ्या आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी येण्याच्या आधी गॅस बंद करा. त्यानंतर या गरम पाण्यात वाटाण्याच्या शेंगा टाका. भांड्यावर झाकण ठेवून त्या दोन ते तीन मिनिटे गरम पाण्यात राहू द्या. यामुळे वाटाण्याच्या शेंगांचे आवरण थोडे मऊ होते आणि त्यातील दाणे बाहेर काढणे सोपे जाते. मात्र, पाणी खूप वेळ उकळू देऊ नका किंवा शेंगा जास्त वेळ गरम पाण्यात ठेवू नका.
गरम पाण्यातून वाटाण्याच्या शेंगा बाहेर काढल्यानंतर त्वरित थंड पाण्यात टाका. गरम आणि थंड पाण्याच्या या बदलामुळे शेंगांचे आवरण सैल होण्यास मदत होते. त्यामुळे शेंगा उघडणे सोपे जाते आणि नखांनी वारंवार शेंगा फोडण्याची गरज भासत नाही.
आता थंड पाण्यातून शेंगा बाहेर काढा. प्रत्येक शेंगेला हाताने हलका दाब द्या किंवा थोडेसे वाकवा.असे केल्यावर शेंगेतील वाटाणे सहज बाहेर पडू लागतील.यामुळे प्रत्येक शेंग नखांनी उघडण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतील. तसेच बोटांवर जास्त ताणही येणार नाही.
हिवाळ्यात अनेकजण मोठ्या प्रमाणात वाटाणे खरेदी करून फ्रीजमध्ये साठवून ठेवतात. अशावेळी ही पद्धत विशेष उपयोगी ठरू शकते. पूर्वी एक-दोन किलो वाटाणे सोलण्यासाठी बराच वेळ द्यावा लागत असे. मात्र, या युक्तीमुळे तीन ते पाच किलो मटार सोलण्याचे कामही तुलनेने सोपे होऊ शकते.
वाटाणे शेंगांमधून बाहेर काढल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर गरजेनुसार भाजीसाठी वापरा किंवा योग्य पद्धतीने साठवून ठेवा.
मटारचे दाणे सोलल्यानंतर ते पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे करून हवाबंद डब्यात किंवा फ्रीजरसाठी योग्य पिशवीत ठेवा. अशा प्रकारे साठवलेली मटार गरजेनुसार विविध पदार्थांसाठी वापरता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.