Health Tips : तुमचीही रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

late night eating habits : रात्री उशिरा जेवण्याची सवयीचा शरीरावर वाईट परिणाम होउ शकतो. वेळीच या सवयीत बदल न केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
LATE NIGHT EATING HEALTH RISKS
LATE NIGHT EATING HEALTH RISKSsaam tv
Published On: 

आजच्या धावपळीच्या जिवनात आपल्याला रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असते. त्यामुळे जेवणही आपण उशीराच करतो मात्र,ही रात्री उशिरा जेवण्याची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याचा परिणाम केवळ पचनसंस्थेवरच नाही, तर झोप, वजन, रक्तातील साखरेची पातळी आणि हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण काय खातो याइतकेच आपण कोणत्या वेळी खातो, हेही महत्त्वाचे आहे. नियमितपणे रात्री उशिरा जेवण्यामुळे शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेतही बदल होण्याची शक्यता असते.

LATE NIGHT EATING HEALTH RISKS
kitchen Tips : भाजीची पातळ झालीय? चव न बदलता घट्ट करण्यासाठी करा हे ५ सोपे घरगुती उपाय

रात्री उशिरा जेवल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

पचनाच्या समस्या वाढू शकतात

रात्रीच्या वेळी शरीर विश्रांतीसाठी तयार होत असते. अशा वेळी उशिरा आणि जड आहार घेतल्यास पचनप्रक्रियेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

वजन वाढण्याचा धोका

रात्री उशिरा जेवल्यानंतर अनेक जण लगेच झोपतात. त्यामुळे जेवण आणि झोप यामधील अंतर कमी होते. रात्री उशिरा खाण्याच्या सवयीमुळे अतिरिक्त कॅलरीचे सेवन होण्याची शक्यता वाढते. परिणामी, वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते.

झोपेवर परिणाम

उशिरा जेवल्यामुळे झोपेच्या वेळीही शरीराला अन्न पचवण्याचे काम करावे लागते. त्यामुळे शांत आणि गाढ झोप मिळण्यात अडथळे येऊ शकतात. झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.

रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता

रात्री उशिरा जेवल्याने शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. विशेषतः रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ किंवा जास्त प्रमाणात कर्बोदके असतील, तर रक्तातील साखरेची पातळी अधिक काळ वाढलेली राहू शकते. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास चयापचयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.

LATE NIGHT EATING HEALTH RISKS
Kitchen Tips : महागडा नॉनस्टिक पॅन लवकर खराब होतोय? वापरताना या 6 चुका टाळा,अन्यथा निघून जाईल कोटिंग

हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

रात्री उशिरा जेवण्याची नियमित सवय वजन वाढणे, रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढणे आणि खराब कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्यांशी जोडली जाते. या सर्व बाबी हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

शरीराचे जैविक घड्याळ बिघडू शकते

आपल्या शरीरातील विविध क्रिया एका नैसर्गिक जैविक घड्याळानुसार सुरू असतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे या चक्रावर परिणाम होऊ शकतो. परिणामी, चयापचयाची प्रक्रिया, हार्मोन्सचे संतुलन आणि शरीराची ऊर्जा यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

आरोग्य चांगले राखण्यासाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी करणे आरोग्यासाठी योग्य ठरु शकते. उदाहरणार्थ, रात्री १० वाजता झोपण्याची सवय असल्यास रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करावा.

रात्रीच्या जेवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे

  • रात्रीचे जेवण हलके, पौष्टिक आणि संतुलित असावे.

  • सहज पचणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  • जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये.

  • जेवणानंतर १० ते १५ मिनिटे हलके चालावे.

  • दररोज शक्यतो एकाच ठरावीक वेळी रात्रीचे जेवण करावे.

निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहारासोबतच जेवणाच्या वेळेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.रात्री उशिरा जेवण्याची सवय टाळून वेळेवर आणि संतुलित आहार घेतल्यास पचन, झोप आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.