

डोळ्याच्या पांढऱ्या भागावर अचानक लाल रंगाचा डाग दिसला की, अनेकांना घाबरायला होतं. डोळ्यात रक्त साचलं आहे किंवा रक्ताची गाठ झाली आहे, असं वाटू शकतं. मात्र डोळ्यावर दिसणारा प्रत्येक लाल डाग गंभीर आजाराचं लक्षण असेलच असं नाही. काही वेळा ही साधी रक्तवाहिनी फुटल्यामुळे झालेली किरकोळ समस्या असते. पण काही परिस्थितींमध्ये डोळ्याच्या आतल्या भागात रेटिनाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊ शकतो. ही स्थिती गंभीर असून वेळेत उपचार न मिळाल्यास दृष्टी कायमची कमी होण्याचा धोका असतो.
तज्ज्ञांच्या मते, डोळ्यात ‘ब्लड क्लॉट’ दिसण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात.
डोळ्याच्या पांढऱ्या भागावर चमकदार लाल रंगाचा डाग दिसत असेल आणि त्यासोबत वेदना किंवा दृष्टी कमी होण्याची समस्या नसेल तर अनेकदा ही डोळ्याच्या वरच्या पातळ थराखालील रक्तवाहिनी फुटल्यामुळे झालेली रक्तस्रावाची स्थिती असते. याला सबकंजंक्टायव्हल हॅमरेज म्हणतात.
डॉ. नितीन डेधिया यांच्या मते, अशा प्रकारचा रक्तस्राव दिसायला खूप गंभीर वाटतो. मात्र बहुतांश वेळा तो धोकादायक नसतो. डोळ्याच्या पांढऱ्या भागावर लाल डाग दिसण्यामागे ही सामान्य कारणांपैकी एक आहे. जोरात शिंकणे, सतत किंवा जोराचा खोकला येणं, उलटी होणं, वजन उचलताना जास्त जोर लावणं किंवा डोळ्याला किरकोळ दुखापत होणं यामुळेही डोळ्यातील बारीक रक्तवाहिनी फुटू शकते.
उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्त गोठण्याशी संबंधित समस्या असलेले लोक किंवा रक्त पातळ ठेवण्यासाठी औषधं घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अशी समस्या दिसण्याची शक्यता जास्त असू शकते.
याउलट डोळ्याच्या आत असलेल्या रेटिनाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला तर परिस्थिती गंभीर असू शकते. रेटिनाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी किंवा रक्त परत नेणारी शिरा बंद झाल्यास डोळ्याच्या दृष्टीवर थेट परिणाम होतो.
रेटिनल व्हेन ऑक्लूजन म्हणजे रेटिनातून रक्त बाहेर नेणाऱ्या शिरेत अडथळा निर्माण होणं. वय वाढणं, उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ग्लॉकोमा यांसारख्या समस्यांशी याचा संबंध असू शकतो.
दुसरीकडे रेटिनाला रक्तपुरवठा करणारी धमनी अचानक बंद झाल्यास त्याला रेटिनल आर्टरी ऑक्लूजन म्हणतात. यामुळे अचानक आणि वेदना न होता दृष्टी कमी होऊ शकते. काही वेळा याला ‘आय स्ट्रोक’ असंही म्हटलं जातं. ही स्थिती शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित इतर गंभीर समस्येचा इशाराही असू शकतं.
उन्हाळ्यात किंवा जास्त उष्ण वातावरणात शरीरातील पाणी कमी होऊ शकते. मात्र केवळ उष्णतेमुळे डोळ्यात रक्ताची गाठ तयार होतं असं नाही. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने रक्त काही प्रमाणात घट्ट होऊ शकतं. त्यामुळे आधीपासूनच रक्तवाहिन्यांशी संबंधित धोका असलेल्या व्यक्तींमध्ये समस्या वाढण्याची शक्यता असते.
साधा सबकंजंक्टायव्हल हॅमरेज असल्यास डोळ्याच्या पांढऱ्या भागावर स्पष्ट लाल डाग दिसतो. सहसा वेदना होत नाहीत आणि दृष्टीवरही परिणाम होत नाही. काही जणांना डोळ्यात थोडी जळजळ किंवा किरकोळ त्रास जाणवू शकतो.
अचानक दृष्टी धूसर होणं
हळूहळू दृष्टी कमी होणं
वस्तू वाकड्या किंवा वेगळ्या दिसणं
डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा तरंगणारे डाग दिसणं
दृष्टीचा काही भाग कमी होणं
एका डोळ्याची पूर्ण किंवा अंशतः दृष्टी जाणं
याशिवाय अचानक डोळ्यात वेदना होणं किंवा डोळ्यासमोर पडदा आल्यासारखं वाटणं हीदेखील गंभीर लक्षणं आहेत. विशेषतः डोळ्याला दुखापत झाल्यानंतर अशी लक्षणं दिसली तर अजिबात वेळ घालवू नये. अचानक दृष्टीमध्ये बदल झाला असल्यास घरगुती उपाय करून थांबू नका. तातडीने नेत्रतज्ज्ञांकडे किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवेकडे जाणं गरजेचं आहे.
डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ डोळ्यांची काळजी घेणं पुरेसं नाही. संपूर्ण शरीराचं आरोग्य नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.
रक्तदाब नियंत्रणात ठेवा
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देऊ नका
धूम्रपानाची सवय असल्यास ती सोडण्याचा प्रयत्न करा
नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम करा
वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्या
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.