

उन्हाळा सुरू झाला की घरातील फ्रिजचा वापर वाढतो. पाणी पिण्यापासून ते थंड पदार्थ आणि आईस्क्रीम काढण्यापर्यंत दिवसातून अनेक वेळा फ्रिज उघडला जातो. अशा वेळी अनेकांच्या फ्रिजच्या दरवाजावर रंगीबेरंगी मॅग्नेट्स, वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या आठवणींच्या वस्तू किंवा लहान मुलांच्या आवडीचे कार्टून स्टिकर्स दिसतात. फ्रिज आकर्षक दिसावा म्हणून हे मॅग्नेट्स लावले जातात. पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार फ्रिजवर मॅग्नेट्स लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजवर लावलेल्या काही मॅग्नेट्समुळे घरातील नकारात्मकता वाढू शकते तर काही मॅग्नेट्स चांगलं वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे फ्रिजवर कोणत्या प्रकारचे मॅग्नेट्स लावावेत आणि कोणते टाळावेत हे जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रात चुंबकीय शक्ती आणि घरातील वेगवेगळ्या दिशांना महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, लोखंड, स्टील यांसारख्या धातूंचा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संबंध शनी आणि राहूशी जोडला जातो. फ्रिजचा संबंध राहूशी मानला जातो. अशा वेळी फ्रिजवर लावलेलं मॅग्नेट त्या जागेतील ऊर्जेवर परिणाम करतात अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.
फ्रिजवर चुकीच्या प्रकारचे मॅग्नेट्स किंवा रंगांचे मॅग्नेट्स लावल्यास घरात नकारात्मकता वाढू शकते. याचा परिणाम घरातील सुख-शांती आणि आर्थिक भरभराटीवर होऊ शकतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
फ्रिजवर सिंह, चित्ता, गरुड किंवा इतर हिंसक प्राण्यांची चित्रं असलेले मॅग्नेट्स लावणं टाळावं.त्याचप्रमाणे युद्ध किंवा शस्त्रांची चित्रं असलेले मॅग्नेट्सही लावू नयेत. यामुळे घरात वाद किंवा चिडचिड वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद होऊन घरातील शांतता बिघडू शकते, अशी मान्यता आहे.
काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी किंवा विचित्र चेहऱ्यांचे मॅग्नेट्स लावायला आवडतात. पण रडणारे चेहरे, उदास फोटो असलेले मॅग्नेट्स फ्रिजवर लावणं टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार, स्वयंपाकघर किंवा अन्न साठवण्याच्या जागेजवळ अशी फोटो असल्यास नकारात्मक विचार वाढू शकतात.
फ्रिजवर कॅक्टस, काटेरी झाडे किंवा सुकलेल्या झाडांची चित्रं असलेले मॅग्नेट्स लावू नयेत असे वास्तुशास्त्र सांगतं. अशा चित्रांमुळे आयुष्यात अडथळे निर्माण होतात अशी मान्यता आहे. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि मोठ्यांच्या प्रगतीवर होऊ शकतो, असंही सांगितलं जातं.
फ्रिजवर एखादे मॅग्नेट तुटलेलं असेल तर ते लगेच काढून टाकावं. तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं मानलं जात नाही. अशा मॅग्नेट्समुळे राहूचा दोष वाढू शकतो आणि अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.
फ्रिज आकर्षक दिसावा आणि घरात सकारात्मक वातावरण राहावं, असं वाटत असेल तर काही खास प्रकारचे मॅग्नेट्स लावण्याचा सल्ला दिला जातो.
फ्रिजवर शुभ-लाभ, स्वस्तिक, ऋद्धी-सिद्धी किंवा 'हॅपी होम' असा मेसेज असलेले मॅग्नेट्स लावू शकता. अशी शुभ चिन्हं घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
फ्रिजवर सफरचंद, द्राक्षे, हिरव्या भाज्या, धान्य किंवा फुलांची चित्रे असलेले मॅग्नेट्स लावणं चांगलं मानलं जातं. अशा मॅग्नेट्समुळे घरात आनंद आणि भरभराटीचं वातावरण राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
हसरे चेहरे, रंगीबेरंगी फुलपाखरं आणि शांत निसर्गाची सुंदर चित्रं असलेले मॅग्नेट्स फ्रिजवर लावू शकता. अशा चित्रांमुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहतं. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि चांगले संबंध टिकून राहण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.