

अनेकांच्या घरात कपाटात, स्टोअर रूममध्ये किंवा बेडच्या खाली जुने कपडे ठेवलेले असतात. काही कपडे बऱ्याच दिवसांपासून वापरलेले नसतात तर काही फाटलेले किंवा खराब झालेले असतात. असे कपडे अनेकदा जागा अडवतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात विनाकारण जुन्या आणि वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवणं चांगलं मानलं जात नाही. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते, अशी मान्यता आहे.
जुने कपडे राहू आणि शनीशी संबंधित मानले जातात. त्यामुळे असे कपडे घरात जास्त काळ ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. मग घरातील जुन्या कपड्यांचे नेमकं काय करावं? ते कोणत्या दिशेला ठेवावेत? याबाबात वास्तू शास्त्रात काही महत्त्वाची माहिती देण्यात आलीये.
घरातील काही जुने कपडे चांगल्या स्थितीत असतील आणि भविष्यात त्यांचा वापर करायचा असेल तर ते व्यवस्थित घडी करून ठेवावेत. वास्तुशास्त्रानुसार, असे कपडे कपाटात किंवा ट्रंकमध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं.
काही कपड्यांची शिवण उसवलेली असते तर काही कपड्यांचा रंग पूर्णपणे खराब झालेला असतो. असे कपडे वापरण्याच्या स्थितीत नसतील, तर ते कपाटात साठवून ठेवू नयेत. असे कपडे वेगळे काढून टाकावेत किंवा त्यांचा योग्य पद्धतीने पुन्हा वापर करावा.
काही कपडे चांगल्या स्थितीत असतात पण तुमच्याकडून त्यांचा वापर होत नाही. असे कपडे घरात ठेवण्याऐवजी गरजू लोकांना दान करता येतात. धार्मिक मान्यतेनुसार, शनिवार किंवा अमावस्येच्या दिवशी जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे दान करणं शुभ मानलं जातं.
जुने कपडे बेडच्या खाली किंवा ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला ठेवणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार यामुळे खोलीतील ऊर्जा प्रभावित होऊ शकते. तसंच झोपेशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी मान्यता आहे.
अनेक घरांमध्ये जुने कपडे पुसण्यासाठी वापरले जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे घर पुसण्यासाठी जुन्या कपड्यांऐवजी वेगळे कापड वापरणं योग्य मानलं जातं.
घरातील जुने कपडे दान करताना त्यांची स्थिती पाहणंही महत्त्वाचं आहे. कपडे फाटलेले असतील किंवा घालण्याच्या योग्य स्थितीत नसतील तर ते कोणालाही दान करू नयेत. गरजू व्यक्तींना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडेच द्यावेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)