

पावसाळा सुरू झाला की अनेकांना केस गळणं, कोंडा, खाज, केस चिकट होणं किंवा विस्कटल्यासारखं दिसणं अशा समस्या जाणवू लागतात. मात्र अनेकदा या समस्या हवामानापेक्षा केसांची चुकीची निगा राखल्यामुळे वाढतात. त्यामुळे वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहण्यापेक्षा योग्य पद्धतीने केसांची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मुळ्या यांच्या मते, पावसाळ्यात केस आणि टाळू स्वच्छ ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी आपल्या केसांच्या प्रकारानुसार योग्य उत्पादनं वापरणं आणि नियमित निगा राखणं आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस निरोगी, मजबूत आणि सुंदर राहू शकतात.
अनेकांचा असा समज असतो की, पावसाचे पाणी केसांसाठी हानिकारक असतं आणि त्यामुळे केस गळतात. पण हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात पावसाळ्यात हवेत वाढणारी आर्द्रता, टाळूचे बिघडलेलं संतुलन यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. हवामानातील अचानक बदलांचा परिणाम टाळूवर होतो आणि त्यामुळे काही काळ केस जास्त गळू शकतात.
काही जण पावसाळ्यात वारंवार केस धुतल्याने केस खराब होतात, असं मानतात. पण प्रत्यक्षात दमट हवेमुळे टाळूवर घाम, तेल आणि धूळ पटकन साचते. केस वेळेवर स्वच्छ न केल्यास टाळूचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे कोंडा, खाज किंवा इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. यासाठी सौम्य शॅम्पूचा नियमित वापर करणं फायदेशीर ठरतं.
पावसाळ्यात रोज भरपूर तेल लावल्याने केस सुरक्षित राहतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र जास्त प्रमाणात तेल लावल्यास केस जड होतात आणि टाळूवरील छिद्रे बंद होण्याची शक्यता वाढतं. यामुळे टाळूचं नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे तेलाचा वापर मर्यादित प्रमाणात करणेच योग्य ठरते.
पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्याने केस तो ओलावा शोषून घेतात. त्यामुळे केस फुगल्यासारखे किंवा विस्कटलेले दिसू शकतात. याचा अर्थ केस खराब झाले आहेत, असा होत नाही. अशा वेळी केस पुन्हा हलक्या हाताने विंचरल्यास ते सहज नियंत्रणात येऊ शकतात.
प्रत्येकाचा केसांचा प्रकार वेगळा असतो. सरळ केस, कुरळे केस किंवा रंग केलेले केस हे हवेतल्या आर्द्रतेला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या केसांमध्ये घाण आणि तेल साचण्याचे प्रमाणही वेगळे असते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या केसांच्या प्रकारानुसार योग्य निगा राखणे गरजेचे आहे.
एकाच वेळी अनेक प्रकारची हेअर केअर उत्पादने वापरणे फायदेशीर ठरेलच असे नाही. उलट त्यामुळे केसांवर आणि टाळूवर उत्पादनांचा थर साचू शकतो. केसांना त्यांच्या प्रकारानुसार आणि समस्येनुसार योग्य उत्पादनांचीच गरज असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांमधील ओलावा टिकवून ठेवणारी, विस्कटलेले केस नियंत्रणात ठेवणारी आणि टाळूचे संतुलन राखणारी उत्पादने निवडावीत.
पावसाळ्यात केसांची निगा राखणे म्हणजे पावसाशी लढा देणे नव्हे, तर या ऋतूमुळे केसांमध्ये होणारे बदल समजून घेणे होय. केसांबाबतचे गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे त्यांची काळजी घेतल्यास अनेक समस्या टाळता येऊ शकतात. सतत वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा केसांच्या गरजेनुसार योग्य पद्धतीने निगा राखणे हेच सर्वात परिणामकारक ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.