Heart-Chest Pain : पोटभर जेवल्यानंतर छातीत दुखतंय? गॅस समजून दुर्लक्ष करू नका, असू शकते 'हे' गंभीर कारण

Heart Health Warning Signs : भरपेट किंवा जड जेवण केल्यानंतर काही लोकांना छातीत दुखणे, जळजळ होणे किंवा दाब जाणवण्याचा त्रास होतो. हृदयविकारतज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
Heart Health Warning Signs
Heart-Chest PainAI PHOTO
Published On: 
Summary

अनेकांना पोटभर जेवल्यानंतर छातीत दुखते

बरेच लोक ॲसिडिटी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात

जास्त खाल्ल्यामुळे पोट फुगणे आणि छातीवर दाब जाणवतो

अनेकदा आवडते पदार्थ किंवा जड जेवण केल्यानंतर काही वेळातच छातीत दुखणे, जळजळ होणे किंवा छातीवर दाब जाणवण्याचा त्रास होतो. विशेषतः तेलकट, मसालेदार किंवा भरपूर जेवण केल्यानंतर हा त्रास अधिक जाणवू शकतो. अशावेळी अनेकजण याला गॅस किंवा ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. मात्र, प्रत्येक वेळी छातीत होणाऱ्या वेदना या पचनाच्या समस्येमुळेच होतात असे नाही. काही वेळा हे हृदयाशी संबंधित आजाराचेही लक्षण असू शकते. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, जड जेवणानंतर छातीत दुखण्यामागे पचनसंस्थेपासून ते हृदयाच्या समस्यांपर्यंत अनेक कारणे असू शकतात.

ॲसिड रिफ्लक्समुळे छातीत जळजळ

जड जेवणानंतर छातीत दुखण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ॲसिड रिफ्लक्स. आपण जेव्हा भरपूर अन्न खातो, तेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येऊ शकते. अन्ननलिकेची आतील त्वचा या आम्लामुळे उत्तेजित झाल्याने छातीत जळजळ आणि वेदना जाणवतात.यात छातीच्या मध्यभागी जळजळ होते. घशात आंबट किंवा कडवट चव येते. वारंवार ढेकर येतात आणि जेवल्यानंतर किंवा झोपल्यावर त्रास वाढतो.

जास्त जेवल्यामुळे पोट फुगणे

एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यास पोटाचा आकार वाढतो. त्यामुळे पोटावर ताण निर्माण होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते. काही वेळा या फुगण्यामुळे छातीच्या भागात दाब किंवा अस्वस्थता जाणवू शकते.विशेषतः कार्बोनेटेड पेये, तेलकट पदार्थ आणि गॅस निर्माण करणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा त्रास वाढू शकतो. वारंवार ढेकर येतात.

अन्ननलिकेच्या स्नायूंमध्ये आकुंचन होणे

अन्ननलिकेचे स्नायू अन्न पोटापर्यंत पोहोचवण्यासाठी नियमितपणे आकुंचन आणि प्रसरण पावतात. मात्र, काही व्यक्तींमध्ये या स्नायूंच्या हालचालींमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे अन्ननलिकेत अचानक आकुंचन निर्माण होऊन छातीत तीव्र वेदना जाणवू शकतात.काही वेळा या वेदना हृदयविकाराच्या वेदनांसारख्या वाटू शकतात.

हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे

जड जेवणानंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेकडे अधिक रक्तपुरवठा करावा लागतो. काही व्यक्तींमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीपासून अरुंदपणा असल्यास जेवणानंतर हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा करण्यात अडचण येऊ शकते. यामुळे छातीत वेदना किंवा दाब जाणवू शकतो.विशेषतः उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण

काही वेळा हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे अॅसिडिटी किंवा अपचनासारखी वाटू शकतात. त्यामुळे जड जेवणानंतर छातीत दुखत असल्यास त्याकडे केवळ गॅसचा त्रास म्हणून पाहणे धोकादायक ठरू शकते.छातीच्या मध्यभागी दाब किंवा आवळल्यासारखे वाटणे. वेदना डाव्या किंवा दोन्ही हातांमध्ये पसरणे. पाठ, मान किंवा जबड्यात वेदना होणे. अचानक थंड घाम येणे. श्वास घेण्यास त्रास होणे. मळमळ, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवणे. ही हॉर्ट अटॅकची सामान्य लक्षणे आहेत.

Heart Health Warning Signs
Death : मृत्यूच्या क्षणी नेमकं काय जाणवतं? शरीर अन् मेंदूमध्ये होतात 'हे' ५ बदल

जेवणानंतर छातीत दुखू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

  • एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी कमी प्रमाणात आणि वेळेवर जेवण करा.

  • तळलेले, अतिमसालेदार आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खा.

  • जेवणानंतर किमान २ ते ३ तास झोपणे टाळा.

  • घाईघाईने जेवण्याऐवजी अन्न व्यवस्थित चावून खा.

  • रात्री उशिरा जड जेवण करणे टाळा.

  • जेवून झाल्यावर १५-२० मिनिटे चालायला जा.

  • जेवणानंतर छातीत दुखण्याचा त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.