Bharat Jadhav
केवळ मानसिक ताणतणावामुळे उद्भवणारी ही लक्षणे अत्यंत खरी आणि तीव्र असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपला मेंदू आणि शरीराचे इतर अवयव यांच्यात असणारा जैविक संवाद. आपण तणाव, भीती किंवा चिंतेचा सामना करतो, तेव्हा शरीर स्वतःचे रक्षण करण्यासाठी 'स्ट्रेस रिस्पॉन्स' करत असते.
ताणतणावाच्या काळात शरीर धोक्याचा सामना करण्यासाठी स्नायू आणि मेंदूकडे अधिक रक्तप्रवाह पाठवते. यामुळे पचनक्रियेकडे होणारा रक्तप्रवाह तात्पुरता मंदावत असतो. यामुळे पोटात दुखणे किंवा मुरडा येणे, मळमळणे, पोट फुगणे, अति-ॲसिडिटी, पातळ जुलाब होण्याचा त्रास उद्भवत असतो.
शरीर सतत सतर्कतेच्या स्थितीत असते, तेव्हा स्नायू दीर्घकाळ आकुंचित राहतात. चिंतेत असताना माणूस नकळत खांदेवर उचलणे, जबडा घट्ट आवळत असतो. या सवयींमुळे मान आखडणे, खांदे दुखणे, ताणामुळे होणारी डोकेदुखी आणि पाठीचा वरचा भाग दुखणे असा त्रास होत असतो.
मेंदू आणि आतडे यांच्यातील संवादामुळे पोटातील हालचाली आणि वेदना जाणवण्याची क्षमता बदलते, त्यामुळे हा त्रास केवळ 'मानसिक भास' नसतो तो पूर्णपणे शारीरिक असतो.
मेंदूला धोक्याचा आभास होताच 'सिम्पेथेटिक मज्जासंस्था' सक्रिय होते आणि शरीरात 'ॲड्रॅनालाईन' सारखे स्ट्रेस हार्मोन्स वेगाने पसरतात. यामुळे हृदयाचे ठोके आणि ते आकुंचित पावण्याची ताकद वाढते, ज्यामुळे छातीत तीव्र धडधड जाणवते.
नियमित हलका व्यायाम ७ ते ८ तासांची शांत झोप, संतुलित आहार, मुबलक पाणी आणि ठराविक दिनचर्या पाळल्यास शरीराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते.