Egg freezing: करिअर की मातृत्व? नोकरदार महिलांचा ‘एग्ज फ्रिजींग’कडे वाढता कल; भविष्यातील आईपणासाठी नवा पर्याय

Egg freezing benefits: करिअरमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याची इच्छा, आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याची धडपड, योग्य जोडीदाराच्या शोधासाठी लागणारा वेळ आणि आयुष्यातील अनेक बदल यामुळे अनेक महिलांकडून लग्न आणि गर्भधारणेचा निर्णय पुढे ढकलला जातो. त्यामुळे आई होण्याचं वयही वाढत जातं.
Egg freezing
Egg freezingsaam tv
Published On

‘आई व्हायचं आहे, पण आत्ता योग्य वेळ नाही’ अशा संभ्रमात असलेल्या महिलांसमोर वाढतं वय आणि त्यासोबत कमी होत जाणारी प्रजननक्षमता हे मोठं आव्हान असतं. अशा वेळी भविष्यात आई होण्याची शक्यता टिकवून ठेवण्यासाठी एग्ज फ्रिजींग हा एक उपयोगी पर्याय ठरू शकतो.

आज अनेक नोकरदार महिला करिअर आणि कुटुंब नियोजनाचं दोन्ही निर्णय एकाच वेळी घेत नाहीत. उच्च शिक्षण, कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, करिअरमधील स्पर्धा, आर्थिक नियोजन तसंच वैयक्तिक आयुष्यात होणारे बदल यामुळे काही महिला गर्भधारणा काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात. मात्र महिलांची प्रजननक्षमता वय वाढत गेल्यानंतर नैसर्गिकरित्या कमी होते. अशा परिस्थितीत भविष्यात गर्भधारणेचा पर्याय उपलब्ध राहावा यासाठी एग्ज फ्रिजींगचा विचार केला जाऊ शकतो.

महिलांच्या शरीरात जन्मापासूनच ठरावीक प्रमाणात स्त्रीबीज म्हणजेच एग्ज असतात. वय वाढत गेल्यावर या अंड्यांची संख्या तसंच त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. विशेषतः वयाची तिशी ओलांडल्यानंतर हा बदल अधिक जाणवू शकतो. त्यामुळे काही महिला तुलनेने कमी वयातच आपली अंडी गोठवून ठेवण्याचा निर्णय घेतात. कमी वयात गोठवलेली अंडी भविष्यात गर्भधारणेसाठी उपयोगी ठरण्याची शक्यता असते.

Egg freezing
Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

एग्ज फ्रिजींगच्या प्रक्रियेत महिलेच्या शरीरातून mature eggs काढून ती सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवली जातात. भविष्यात गरज पडल्यास या एग्जचा वापर करता येतो. त्यामुळे सध्या आई होण्यासाठी तयार नसलेल्या महिलेला पुढील काळात कुटुंब नियोजन करताना आणखी एक पर्याय मिळतो. मात्र अंडी गोठवून ठेवल्यामुळे भविष्यात गर्भधारणा होईलच किंवा निरोगी बाळाचा जन्म निश्चित होईलच, असं सांगता येत नाही.

प्रत्येक महिलेच्या शरीरातून मिळणाऱ्या एग्सची संख्या सारखी नसते. महिलेचं वय, अंडाशयातील अंड्यांचा साठा आणि औषधांना शरीराकडून मिळणारा प्रतिसाद अशा अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतो. त्यामुळे एग्ज फ्रिजींगची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी डॉक्टर एएमएच चाचणी आणि सोनोग्राफी यांसारख्या तपासण्या करून अंड्यांचा साठा किती आहे, याचा अंदाज घेऊ शकतात.

एग्ज फ्रिजींग फक्त प्रसिद्ध व्यक्ती किंवा मोठ्या पदांवर काम करणाऱ्या महिलाच करतात, असा समज चुकीचा आहे. वैयक्तिक कारणं, करिअर, आर्थिक नियोजन किंवा इतर कारणांमुळे भविष्यातील मातृत्व पुढे ढकलण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही महिलेला या पर्यायाबाबत डॉक्टरांशी चर्चा करता येते. हा निर्णय केवळ बदलता ट्रेंड किंवा समाजाच्या दबावामुळे घेण्याऐवजी स्वतःचं वय, प्रजननक्षमता आणि भविष्यातील कुटुंब नियोजनाची गरज लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर घेणं महत्त्वाचं आहे.

एग्ज फ्रिजींगचा संबंध केवळ करिअर किंवा वैयक्तिक नियोजनाशी नाही. कॅन्सरवरील काही उपचार विशेषतः केमोथेरपी किंवा अंडाशयाच्या कामावर परिणाम करणाऱ्या काही वैद्यकीय उपचारांपूर्वीही भविष्यातील प्रजननक्षमता जपण्यासाठी महिलांना एग्ज फ्रिजींगचा सल्ला दिला जाऊ शकतो.

प्रत्येक नोकरदार महिलेने एग्ज फ्रिजींग करणं आवश्यक आहे, असे नाही. केवळ करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे प्रत्येक महिलेने आपली प्रजननक्षमता जपण्यासाठी ही प्रक्रिया करावी, असा कोणताही दबाव असू नये. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास महिलेच्या अंड्यांचा साठा किती आहे, वयानुसार प्रजननक्षमतेत कोणते बदल होऊ शकतात, स्वतःची वैयक्तिक उद्दिष्टं काय आहेत आणि भविष्यात कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याची योग्य माहिती मिळू शकते.

Egg freezing
Smartphone battery: या 7 कारणांमुळे तुमचा फोन होतोय अचानक स्लो

एग्ज फ्रिजींग हा भविष्यातील कुटुंब नियोजनासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो. मात्र, या प्रक्रियेमुळे भविष्यात गर्भधारणा होईलच, असं निश्चितपणे सांगता येत नाही. अंडी गोठवताना महिलेचे वय किती आहे, किती अंडी गोठवली आहेत, त्यांची गुणवत्ता कशी आहे आणि भविष्यातील प्रजनन आरोग्य कसं आहे, अशा अनेक गोष्टींवर यश अवलंबून असतं. त्यामुळे एग्ज फ्रिजींगबाबत वास्तव परिस्थिती समजून घेणं, योग्य अपेक्षा ठेवणं आणि प्रजननतज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करणं महत्त्वाचं आहे.

ठाण्याच्या नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीमधील फर्टीलिटी एक्स्पर्ट, डॉ. विशेषा यादव म्हणाल्या, महिलांच्या करिअरमधील बदल, नातेसंबंध आणि वैयक्तिक प्राधान्यक्रम यामुळे भविष्यातील मातृत्वाचं नियोजन करण्याची पद्धतही बदलतेय. काही महिलांसाठी कमी वयात एग्ज फ्रिजींग करणं हा पुढील काळातील कुटुंब नियोजनासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

Egg freezing
Social media addiction: रोज 150 मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर स्क्रोल करताय? सावधान! डिप्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता

मात्र, या प्रक्रियेकडे गर्भधारणा निश्चित करण्याचा मार्ग म्हणून न पाहता भविष्यातील प्रजननक्षमता जपण्याचा एक पर्याय म्हणून पाहणं अधिक योग्य आहे. वयानुसार प्रजननक्षमतेत होणारे बदल समजून घेणं, गरजेनुसार वैद्यकीय तपासण्या करून घेणं आणि आपल्या परिस्थितीनुसार प्रजननतज्ज्ञांचा सल्ला घेणं यामुळे महिलांना भीती किंवा समाजाच्या दबावाशिवाय स्वतःसाठी योग्य निर्णय घेता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com