can husband and wife check each other's phones : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण पती-पत्नी किंवा कपल्सने एकमेकांचा फोन चेक करावा की करू नये? हा प्रश्न अनेकदा नात्यांमध्ये वादाचे कारण ठरतो. एका बाजूला नात्यात पारदर्शकता आणि विश्वास असावा असं वाटतं, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येकाची वैयक्तिक प्रायव्हसी (गोपनीयता) जपणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.
कपल्सने एकमेकांचा फोन तपासल्याने नात्यात नक्की काय बदल घडतात? यामुळे संशय वाढतो की विश्वास दृढ होतो? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आणि नातं घट्ट ठेवण्यासाठी प्रायव्हसी व विश्वासाचा समतोल कसा साधावा, याविषयी तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊया.
पार्टनरचा फोन समोर दिसल्यावर किंवा मेसेजची ट्यून वाजल्यावर तो गुपचूप चेक का? हा प्रश्न अनेक नात्यांमध्ये निर्माण होतो. पण जोडीदाराचा फोन वारंवार चेक करणे हे प्रेमाचे नसून नात्यातील अविश्वासाचे आणि संशयाचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेय. लग्नानंतर किंवा नात्यात असतानाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्पेस (Personal Space) आवश्यक असते. फोनमध्ये ऑफिसचे काम, मित्रांसोबतच्या गप्पा आणि कुटुंबाशी निगडित गोष्टी असतात. फोनमधील अर्धवट मेसेज किंवा गप्पांचा चुकीचा अर्थ काढून नात्यात नको तो तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर पार्टनरबद्दल किंवा त्याच्या फोनमधील गोष्टींबद्दल मनात काही शंका असेल, तर गुपचूप फोन पाहण्यापेक्षा त्यांच्याशी थेट आणि उघडपणे संवाद साधावा, असे तज्ज्ञांनी सांगितलेय.
अनेकदा जोडीदाराच्या वागणुकीत बदल दिसल्यानंतर मनात संशयाचे भूत जागं होतं. कुठेही फोन ठेवणारी व्यक्ती अचानक नेहमी स्वतःजवळ ठेवू लागली, मेसेज येताच स्क्रीन लपवू लागली किंवा फोनवर बोलण्यासाठी दुसऱ्या खोलीत जाऊ लागली, तर मनात संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक बदलाचा अर्थ पार्टनर तुम्हाला धोका देतो असा होत नाही. ऑफिसचा तणाव, एखादी वैयक्तिक अडचण किंवा मित्राची कोणतीतरी खासगी गोष्ट यामागील कारण असू शकते.
त्यामुळे फक्त संशय, शंका आहे म्हणून गुपचूप फोन तपासणे हा यावरचा योग्य मार्ग नाही. यामुळे नात्यातील संशय अधिक वाढतो आणि विश्वास कमी होतो.
पार्टनरच्या वागण्यामुळे तुमच्या मनात संशयाची ठिणगी पडली असेल, मन अस्वस्थ असेल तर गुपचूप फोन तपासण्यापेक्षा स्पष्टपणे आणि खुलून बोला. हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे दोघांमधील संशय वाढणार नाहीच, त्याशिवाय खटके कमी उडतील.
पार्टनरसोबत त्या विषयावर बोलताना सांभाळून बोलावे. तुमच्या शब्दामुळे त्यांचं मन दुखावू शकतो. "तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात" असा आरोप करण्याऐवजी स्वतःच्या भावना व्यक्त करा. तुम्ही त्यांना सहज म्हणू शकता, आजकाल तुम्ही थोडे वेगळे वागत आहात, सतत फोन हातात दिसतोय.त्यामुळे मला थोडे अस्वस्थ आणि विचित्र वाटत आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीला तिची बाजू मांडण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची योग्य संधी मिळते.
अनेक पती-पत्नीला एकमेकांच्या फोनचा पासवर्ड माहिती असतो. ही स्वतःहून एकमेकांना सांगितलेली गोष्ट असल्यास विश्वासाचे लक्षण नक्कीच असू शकते, त्यात काही चुकीचं नाही. पण पासवर्ड माहीत आहे म्हणून जेव्हा वाटेल तेव्हा पार्टनरचा फोन उघडून मेसेज किंवा चॅट्स वाचणे चुकीचे आहे.
फोनचा पासवर्ड माहीत असणे आणि तो फोन कधीही पाहण्याची परवानगी असणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नात्यात कितीही प्रेम आणि जवळीक असली, तरी समोरच्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य, तिची खासगी जागा आणि तिच्या इच्छेचा आदर करणे तितकेच गरजेचे असते.
लग्नानंतर किंवा नात्यात आल्यानंतरही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची थोडी वैयक्तिक जागा (Privacy) असण्याचा पूर्ण अधिकार आहे. नात्यात प्रायव्हसी असणे म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी चुकीचे लपवत आहे, असा अर्थ होत नाही. कदाचित एखाद्या मित्राने आपली वैयक्तिक अडचण सांगितली असेल, किंवा कुटुंबातील सदस्याने एखादी खासगी गोष्ट शेअर केली असेल. अशा प्रत्येक गोष्टीची माहिती पार्टनरला देणे किंवा सांगणे गरजेचे नसते. नात्यात एकत्र राहूनही दोघांना आपापलं स्वातंत्र्य मिळायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.