पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Nagpur hotel room murder case involving railway employees : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची चाकूने सपासप वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव शिवानी गजभिये (वय २८) असून, गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव किरण आत्राम असे आहे. ही भयंकर घटना मनीषनगरमधील एका हॉटेलच्या रूम क्रमांक ३०२ मध्ये घडली. मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास या रूममधून अचानक मोठ्याने किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. आवाज ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रूमकडे धाव घेतली. जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला, तेव्हा शिवानी आणि किरण दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांच्या बाजूलाच रक्ताने माखलेला एक चाकूही पोलिसांना सापडला आहे.
हत्येचे कारण काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवानी आणि किरण हे दोघेही रेल्वे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून, लग्नाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात हॉटेलच्या रूममध्ये मोठा वाद झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच वादातून संतापाच्या भरात किरणने शिवानीवर चाकूने अनेक प्राणघातक वार केले. यात शिवानीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर किरणने स्वतःलाही चाकूने जखमी करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
हॉटेल प्रशासनाकडून घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासून शिवानीला मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या किरणवर सध्या रुग्णालयात कसून उपचार सुरू आहेत.
ही घटना केवळ अचानक झालेल्या वादातून घडली की हा हल्ला पूर्वनियोजित होता? किरणने हत्या करण्याच्या उद्देशानेच चाकू सोबत आणला होता का? अशा सर्व बाजूने बेलतरोडी पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.