

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक नवीन सवय नकळत आपल्या अंगवळणी पडत चालली आहे. ती सवय म्हणजे प्रत्येक गोष्ट घाईत करण्याची. काम असो, जेवण असो किंवा विचार करणं सगळं काही पटकन उरकण्याच्या नादात आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय. डॉक्टरांच्या मते, ही सततची घाई दिसायला जरी प्रोडक्टिव वाटत असली तरी शरीरावर तिचे गंभीर परिणाम होत आहेत.
सतत घाईत राहणं म्हणजे फक्त उशीर होत असल्यामुळे धावपळ करणं इतकंच नाही. ही एक सवय बनते, जिथे माणूस प्रत्येक गोष्ट पटकन कऱण्याचा विचार करतो. यामध्ये जेवताना घाई, आराम करतानाही पुढच्या कामाचा विचार, शरीराला विश्रांती न देणं या सगळ्यामुळे शरीराचं नैसर्गिक चक्र बिघडतं. खरं तर शरीराला काम आणि विश्रांती यामध्ये संतुलनाची गरज असते, पण घाईमुळे हे संतुलन ढासळू लागतं.
डॉक्टर सांगतात की, ज्यावेळी एखादी व्यक्ती कायम घाईत असते, तेव्हा शरीर त्याला ताणाची स्थिती समजते. अशावेळी हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही वाढतो. ही अवस्था दीर्घकाळ राहिली तर हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
घाईत खाण्याची सवय पचनसंस्थेसाठी अत्यंत घातक ठरते. जेवताना अन्न नीट चावलं जात नाही, त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. अशावेळी पोटात अॅसिडचं प्रमाण वाढतं आणि रक्तप्रवाहही पचनसंस्थेकडे कमी होतो. यामुळे पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
सतत घाईत राहिल्यामुळे शरीरातील ताण निर्माण करणारे हार्मोन्स कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन यांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराचा हार्मोनल बॅलन्स बिघडतो. याचा परिणाम इन्सुलिन, थायरॉईड आणि भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर होतो. परिणामी वारंवार भूक लागणं, थकवा जाणवणं, झोप पूर्ण न होणं आणि वजन वाढणं अशा समस्या दिसून येतात.
तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीर सतत धावपळ करण्यासाठी बनलेलं नाही. त्याला वेळोवेळी विश्रांतीची गरज असते. कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक घेणं, शांतपणे जेवण करणं आणि पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.