National Award-winning filmmaker Raj More : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रकार राज मोरे यांच्या 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर एका रात्रीत वाद पेटला. सेन्सॉर बोर्डाचे 'यू' (U) सर्टिफिकेट मिळूनही आणि फ्रान्समधील प्रतिष्ठित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'पर्यंत मजल मारूनही हा चित्रपट चित्रपटगृहात का प्रदर्शित होऊ शकला नाही? सरकारनं यावर नेमकी बंदी का आणली होती? या सर्व प्रश्नांवर दिग्दर्शक राज मोरे यांनी निलेश खरे यांच्या Black & White या कार्यक्रमात जाहीर खुलासा केला.
ट्रेलर आला आणि गैरसमज पसरला : राज मोरे
आजकाल लोक पूर्ण चित्रपट न पाहताच केवळ ट्रेलरवरून मत बनवतात. 'खालिद का शिवाजी' या नावावरून सोशल मीडियावर एकच वादळ उठले. हा चित्रपट केवळ एका धर्माचीच बाजू मांडणारा असल्याचा चुकीचा समज काही कट्टरपंथीयांनी आणि नेटीझन्सनी करून घेतला. वास्तविक पाहता, महाराज हे कोणा एका धर्माचे नसून ते सर्वांचेच आहेत. ते गणेशचे असू शकतात, उस्मानचे असू शकतात आणि खालिदचेही असू शकतात, असे चित्रपटावर झालेल्या वादाबद्दल बोलताना राज मोरे म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा (MIB) आक्षेप काय होता?
चित्रपटगृहातील प्रदर्शनावर आलेल्या बंदीबाबत मोरे यांनी सांगितले की, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अधिकृत 'यू' सर्टिफिकेट मिळाले होते. तरीही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) त्यावर आक्षेप घेतला.
चित्रपट जेव्हा प्रदर्शित होणार होता, तो ऑगस्टचा काळ होता. तेव्हा राज्यात गणपती आणि दहीहंडीसारखे मोठे सण होते, तसेच निवडणुकाही तोंडावर होत्या. अशा संवेदनशील काळात या चित्रपटामुळे समाजात 'ध्रुवीकरण' (Polarization) होऊ शकते, असे कारण देत सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्पुरती स्थगिती दिली होती आणि चित्रपट पुन्हा 'रि-सेन्सॉर'साठी दिल्लीला पाठवला होता.
प्रश्न : कास्टिंग करताना खालिदच्या भूमिकेसाठी मुलाची निवड का केली?
राज मोरे: नाही ते प्रक्रियेतूनच झालेलं आहे. त्या खालीदसाठी खूप साऱ्या कास्टिंग बघितल्या आणि त्यांनी पण जसं मी या चित्रपटाला तीन वर्ष दिले, त्यांनी त्या फिल्मला संपूर्ण एक वर्ष दिलं.
म्हणजे मी मजाक मध्ये त्याला म्हणत होतो की या वर्षी तू शाळेत नापास झाला चालेल. पण खालीद करताना पास झाला पाहिजे.
प्रश्न: त्याला तुम्ही पास केलं की नापास केलं ?
राज मोरे: माझ्यापेक्षा हे प्रेक्षकांनी सांगावं, मला वाटतं की तो खालीद वाटतो की नाही वाटतं, त्याच्या प्रतिक्रिया त्यांनी द्याव्या.
खालिदच्या नजरेतून शिवाजी सांगावसं का वाटले?
हा चित्रपट कोणत्याही राजकीय अजेंड्यावर किंवा इतिहासावर आधारित नाही, तर एका लहान मुलाच्या मानसिकतेवर आधारित आहे. राज मोरे यांनी या कथेमागील कारण सांगितले. ते म्हणाले की, सोशल मीडियावर एका पीएचडी धारक विद्वानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याने सांगितले होते की, शाळेत असताना वर्गातील मुले त्याला त्याच्या धर्मावरून 'अफझल खान' म्हणून चिडवायची. हीच लाईन पकडून कथा लिहिली. चित्रपटातील 'खालिद' हा चौथी इयत्तेत शिकणारा एक निष्पाप मुलगा आहे. वर्गात जेव्हा शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध कसा केला, हा धडा शिकवला जातो, तेव्हा इतर मुले खालिदला 'अफझल खान' म्हणून चिडवू लागतात. या चिडवण्यामुळे खालिदच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तो आपल्या भंगारवाला असलेल्या वडिलांनी आणलेल्या एका खेळण्याशी संवाद साधत, स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आणि त्याला त्याचा 'शिवाजी' सापडतो. हा चित्रपट सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा आहे.
थिएटर बंद, पण आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर रिलीज
थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित न होऊ शकल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांचे मोठे नुकसान झाले. कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या पडद्यासाठी बनवलेला हा चित्रपट शेवटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओटीटी (OTT) माध्यमाचा आधार घ्यावा लागला.
हा चित्रपट आता Apple Movies (ॲपल मूव्हीज) सारख्या जागतिक आणि दर्जेदार प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यासोबतच तो BookMyShow Stream आणि YouTube Movies वरही रेंटवर पाहता येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.