Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकी कोणती घटना घडली होती? या घटनेमागचे सत्य काय आहे? या प्रश्नांची उत्तरे आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. कारण 'जय श्री राम' हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. वेगळा विषय, थरारक कथा आणि भव्य निर्मितीमूल्ये यामुळे या चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची उभारणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये घडलेली एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणार आहे. या घटनेमागील नेमकी कहाणी काय आहे, तिथे काय घडले होते आणि या घटनेचे कोणते पैलू प्रेक्षकांसमोर येणार, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. 'जय श्री राम' या चित्रपटातून याच घटनेची मांडणी केली जाणार आहे.
'सेव्हन ओशन स्टुडिओज' आणि 'अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'जय श्री राम' या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर विनोद वणवे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसाठी भव्य स्तरावर तयारी करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यातील दमदार स्टारकास्ट. मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मात्र, चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण यादी आणि त्यांच्या भूमिकांबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'जय श्री राम' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच तारिख जाहिर करण्यात येणार आहे.