Marathi Singer Death: मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. बुधवारी दादर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते आणि अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
विनय मांडके यांचे निधन ३ एप्रिल रोजी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज अशी ओळख असलेले विनय मांडके हे प्रामुख्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन करत असत. बेर्डे यांच्या अभिनयाला मांडके यांच्या आवाजाची जोड मिळाल्याने हे समीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. त्यामुळेच पुढे त्यांची “लक्ष्याचा आवाज” अशी वेगळी ओळख निर्माण झाली.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी आणि बप्पी लाहिरी यांसारख्या नामांकित संगीतकारांसोबत त्यांनी आपली कला सादर केली.
विशेष म्हणजे, ‘हमारा बजाज’ या लोकप्रिय जिंगलमुळे त्यांचा आवाज घराघरात पोहोचला. या जिंगलने त्यांना वेगळी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या आवाजात एक वेगळी ऊर्जा आणि ओळख होती, जी श्रोत्यांना आजही आठवते. विनय मांडके यांच्या निधनाने संगीतसृष्टीतील एक महत्त्वाचा आवाज कायमचा हरपला आहे. त्यांच्या गाण्यांमधून आणि योगदानातून ते नेहमीच रसिकांच्या स्मरणात राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.