टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा
हल्ल्याचा नेमका हेतू सांगत आरोपींचा धक्कादायक दावा
पिस्तूल, काडतुसे खरेदीसाठी २.५० लाख रुपये खर्च
साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी शूटर फूल सिंह आणि रेहान यांनी चौकशीदरम्यान टायगर श्रॉफची हत्या करण्याचा हेतू नव्हता, तर त्याला केवळ घाबरवायचे होते, असा कथित दावा केल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचेही आरोपींच्या कथित जबाबातून समजले. सध्या या दाव्यांची मुंबई क्राइम ब्रँचकडून पडताळणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ फुटबॉल सामना खेळत असताना आरोपी त्याच्या जवळ होते. त्यावेळी टायगर स्पष्टपणे दिसत होता आणि त्याच्या आसपास सुरक्षा रक्षकही नव्हते, असा दावा आरोपींनी केल्याचे सांगितले गेले. हत्या करण्याचाच हेतू असता, तर फुटबॉल सामना सुरू असतानाच हल्ला केला असता, असेही आरोपींच्या कथित जबाबात म्हटल्याची माहिती आहे. मात्र, गोळीबारामागील नेमका हेतू काय होता आणि या कटामागे कोणाचा हात आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात वापरण्यात आलेल्या झिगाना पिस्तूलच्या खरेदीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पिस्तूलसह २० काडतुसे खरेदी करण्यासाठी सुमारे २.५० लाख रुपये खर्च करण्यात आले. ही शस्त्रे अमृतसरमधून खरेदी केल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगितले जाते.
बिष्णोई गँगचा कथित हस्तक अनिल पंडित याच्या निर्देशानुसार आरोपी कुणाल, सुमित आणि जतिन पैसे घेऊन अमृतसरला पोहोचले होते. तेथील एका अज्ञात ठिकाणाहून पिस्तूल आणि काडतुसे घेतल्यानंतर त्याच ठिकाणी पैसे ठेवल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, शस्त्र आणि काडतुसे पुरवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचकडून तपास सुरू आहे. आरोपींचे कथित दावे, शस्त्राचा पुरवठा आणि या संपूर्ण कटामागील सूत्रधार कोण, याचा उलगडा तपासातून होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.